वसईतील एका जोडप्याला ब्लॅकमेल करुन आरोपीने इन्स्टाग्रामवरुन त्यांच्याकडे खंडणीची रक्कम मागितल्याचे समोर आले आहे. या जोडप्यामधील एकाने वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. आरोपीने इन्स्टाग्रामवर एक बनावट अकाऊंट बनवून बिटकॉइनच्या रुपात ९० हजार रुपये मागितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

आरोपीने जोडप्यापैकी एकाच्या मोबाइलवर फोन केला व तुमचे दोघांचे फोटो माझ्याकडे आहेत असे सांगितले. त्याने हे फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करण्याची धमकी दिली तसेच पैसे मिळाले नाहीत तर, मुलीच्या कुटुंबियांपर्यंत हो फोटो पोहोचतील असा इशारा दिला.

या जोडप्याने ५० हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली पण त्यांनी नंतर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांच्या अंदाजानुसार आरोपी कोणतरी ओळखीचच आहे. त्याच्याकडे या जोडप्याचे फोटो आहेत. त्यामुळे तो ब्लॅकमेल करतोय. आरोपीने मोबाइल फोन हॅक करुन हे फोटो मिळवल्याची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही. पोलिसांनी आपल्या पद्धतीने गुन्हेगाराला शोधून काढण्यासाठी तपास सुरु केला आहे. अशा धमक्यांना बळी न पडता आमच्यासाठी संपर्क साधा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.