दहशतवादविरोधी जनजागृती मोहिमेत सहभागी झालेल्या दुचाकीची खरेदी

वसईतील एका तरुणाकडे असलेली एक बुलेट दिसायला इतर बुलेटसारखी असली तरी तिला विशेष महत्त्व आहे, कारण ही बुलेट नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या (एनएसजी) कमांडोंनी दहशतवादविरोधात लढा देण्यासाठी आखलेल्या खास मोहिमेचा भाग होती. दहशतवादविरोधातील ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर या बुलेटची निर्मिती करणाऱ्या कंपनीने शौर्याचे प्रतीक असलेल्या या बुलेट जनतेला विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या. वसईतील एका तरुणाने ही बुलेट विकत घेतली.

एनएसजीच्या स्थापनेला ३३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कमांडोंनी मोटारसायकलींवरून देशभरात भ्रमंती करून दहशतवादाविरोधात जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम आखली होती. सप्टेंबर २०१७ मध्ये एनएसजीच्या कमांडोंची ही मोहीम देशाच्या विविध भागांत तब्बल ४० दिवस चालली. एनएसजीच्या कमांडोंनी मुंबईसह कोलकाता, गांधीनगर, हैदराबाद, चेन्नई आदी शहरांत आठ हजार किलोमीटरचा प्रवास रॉयल एनफिल्ड या बुलेटवरून केला होता. खडतर प्रवास करीत देशवासीयांना ते सुरक्षित असल्याची खात्री देत दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी आम्ही खंबीर आहोत, असा संदेश त्यांनी दिला. या मोहिमेची आठवण कायम राहावी आणि कमांडोंनी वापरलेल्या बुलेट नागरिकांना मिळाव्यात यासाठी रॉयल एनफिल्ड या बुलेट बनवणाऱ्या कंपनीने या सर्व बुलेट ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यातून  मिळणारे पैसे हे ‘प्रेरणा’ या सामाजिक संस्थेला देण्यात येणार आहेत.

ज्या वेळी कंपनीने या बुलेटच्या नोंदणीसाठी आपल्या संकेतस्थळावर प्रस्ताव ठेवला, तेव्हा देशभरातून हजारो लोकांनी नोंदणी केली होती.१३ डिसेंबर रोजी ऑनलाइन विक्री खुली करण्यात आली.

अवघ्या १५ सेकंदांत १५ बुलेटची विक्री झाली. त्यातील एक बुलेट वसईतील अविनाश कुसे या तरुणाला मिळाली.  सोमवारी या बुलेटचा ताबा मिळाल्याचे अविनाश कुसे याने सांगितले.

देशासाठी लढणाऱ्या कमांडोंनी चालवलेली बुलेट आता माझ्या हातात आली ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. ही बुलेट मला कायमस्वरूपी देशसेवेची प्रेरणा देत राहील.

– अविनाश कुसे