महापालिका परिवहन सेवेच्या भाडय़ात दोन रुपयांनी वाढ; पहिल्या टप्प्याचे भाडे १३ रुपये

वसईकरांवर कराचा बोजा लादणाऱ्या वसई-विरार महापालिकेने परिवहन सेवेच्या भाडय़ातही वाढ केली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून बसभाडे दोन रुपयांनी वाढले असून त्यापैकी पहिल्या महिन्यात एक रुपया आणि दुसऱ्या महिन्यात एक रुपया अशी भाडेवाढ करण्यात आली आहे. परिवहन सेवेच्या पहिल्या टप्प्याचे भाडे आता ११ रुपयांहून १३ रुपये झाले असून अन्य टप्प्यांमध्येही दोन रुपयांनी वाढ झाली आहे. २०१६ पासून भाडेवाढ केलेली नव्हती, अशी सारवासारव करीत ही भाडेवाढ करण्यात आली आहे.

वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा मेसर्स भगीरथी ट्रान्सपोर्ट लिमिटेड या खासगी ठेकदारामार्फत राबवली जात आहे. एकूण ३८ मार्गावर ही बससेवा चालते. दररोज ८० ते ८५ हजार प्रवासी या बसमधून प्रवास करतात. महापालिकेने आता डिझेल दरवाढीचे कारण देत प्रवाशांवर भाडेवाढ लादली आहे. महासभेनेही त्याला मंजुरी दिली आहे. बुधवारी मध्यरात्री १२ पासून ही भाडेवाढ लागू होणार आहे. चार किलोमीटरपासून पुढील टप्प्यात ही भाडेवाढ लागू केली जाणार आहे. लगेच दोन रुपयांची भाडेवाढ न करता दोन महिन्यांच्या अंतराने एक एक रुपया भाडेवाढ केली जाणार आहे. सप्टेंबर महिन्यात एक रुपयांची भाडेवाढ तर त्याच्या पुढच्या म्हणजे ऑक्टोबर महिन्यात एक रुपया अशी भाडेवाढ केली जाणार आहे. त्यामुळे ११ रुपयांचे तिकीट १३ रुपये होणार आहे.

२०१६ नंतर प्रथमच दरवाढ केल्याचा दावा महापालिकेने केला आहे. डिझेलचे भाव वाढल्याचे कारण देण्यात आले आहे. पहिवहन सेवेच्या बसेसना दर महिन्याला २ लाख ४० हजार रुपयांचे डिझेल लागते. पूर्वी डिझेलचा दर ५४ रुपये होता. आता तो ५८ रुपये झाला आहे. त्यामुळे परिवहन सेवेला दर महिन्याला ५५ ते ६० लाख रुपयांचा तोटा होतो, असे परिवहन सेवा चालविणारे मेसर्स भगीरथी ट्रान्सपोर्टचे संचालक मनोहर सतपाळ यांनी सांगितले.

‘सुविधांचे काय?’

परिवहन सेवेने केलेल्या दरवाढीला शिवसेनेने तीव्र विरोध केला आहे. प्रवाशांना पायाभूत सुविधा मिळत नसताना दरवाढ करणे योग्य नाही, असे सांगून दरवाढीला विरोध केला. मात्र पालिकेत शिवसेनेचे सदस्य किरण चेंदवणकर यांचा अपवाद वगळता कुणीच विरोध केला नसल्याने दरवाढ अवघ्या पाच मिनिटांत बहुमताने मंजूर झाली होती. बसचा ठेका देताना आगार असावे ही प्राथमिक अट होती. आजही पालिकेच्या परिवहन सेवेकडे स्वत:चे आगार नसल्याने बस रस्त्यावर असतात आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होती, असे चेंदवणकर यांनी सांगितले.

२०१६ नंतर प्रथमच दरवाढ केली आहे. भाववाढ झाली असली तरी प्रवाशांना अधिकाअधिक सुविधा दिल्या जातील. बस आगारासाठी प्रयत्न सुरू आहे.

– प्रीतेश पाटील, सभापती, परिवहन विभाग