|| प्रसेनजीत इंगळे

पेल्हार धरणातील जलशुद्धीकरण करणारी यंत्रे नादुरुस्त :– वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेल्हार धरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रातील आठपैकी पाच यंत्रे गेल्या दोन वर्षांपासून बंद आहेत. पाण्याच्या टाक्यांचीही स्वछता केलेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांना मिळणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पेल्हार धरणातून शहरातला दररोज १४ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. हे पाणी प्रामुख्याने गोखीवरे, वालीव, राजावली, टीवरी, सातिवली, आणि जुचंद्र या भागात वितरित केले जाते. पाणी वितरित करण्यापूर्वी शुद्ध करण्यासाठी येथे  जलशुद्धीकरण केंद्र आहे. मागील दोन वर्षांपासून या केंद्राची दुरवस्था झाली आहे. या केंद्रात पाणी शुद्ध करण्यासाठी तीन पम्पिंग मशीन, आठ जलशुद्धीकरण टाक्या (फिल्टर टँक) आहेत. पम्पिंग मशीनच्या साहाय्याने पाणी शुद्ध करून साठवणीच्या टाक्यापर्यंत पोहोचविले जाते आणि साठवणीच्या टाक्यांमधून शहरात वितरित केले जाते. पण या ठिकाणी दोन पम्पिंग मशीन बंद आहेत. त्यांची दुरुस्ती झालीच नाही. तर आठ फिल्टर टँकपैकी पाच बंद अवस्थेत आहेत.

अस्वच्छता आणि दुरवस्था

धरणातील पाणी सेटलिंग टँकमध्ये आणले जाते, त्यात आलम (तुरटी) आणि ब्लीचिंग पावडर मिसळली जाते आणि नंतर ते पाणी एका मोठय़ा टाकीत आणले जाते. पण या टाकीची इतकी दुरवस्था आहे की, या टाकीवरील झाकणे खराब आहेत. या टाकीवर कोणतेही सुरक्षाकवच नाही. ही टाकी वर्षांनुवर्षे साफ केली जात नाही. टाकीवर झाकणे नसल्याने या टाकीत कचरा, कीटक, सरपटणारी जनावरे पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पाण्यात मिसळली जाणारी क्लोरीन पावडर आणि तुरटी यांची साठवणूक अतिशय अस्वच्छ जागेत केली जाते, साठवणूक करण्यात येणाऱ्या खोलीला दरवाजा नाही, सर्व समान अस्ताव्यस्त पडलेले आहे, तुरटी आणि क्लोरीन पावडर मिसळवण्यासाठी असलेले यंत्र कित्येक वर्षांपासून बंद आहे.

नियोजनाचा अभाव

केंद्रातील टाक्यांची स्वच्छताही नियमित केली जात नाही.या टाक्यांत जे पाणी शुद्ध केले जाते ते किती प्रमाणात शुद्ध झाले याची तपासणीही केली जात नाही. कित्येक वर्षांपासून या केंद्राकडे महापालिकेने लक्ष दिले नाही. कमालीची अस्वच्छता आणि नियोजनाचा अभाव यामुळे या केंद्राची मोठी दुरवस्था झाली आहे.

या जलशुद्धी केंद्राच्या नूतनीकरणासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. लवकरच नवीन यंत्रणा उभारण्यात येईल. – माधव जवादे, शहर अभियंता