News Flash

वसाहतीचे ठाणे : विस्तारित शहरातील ‘कल्याण’कारी निवास

ठाण्यात घोडबंदर परिसर जसा नवे ठाणे म्हणून विकसित झाला, तशीच कल्याणमध्ये खडकपाडा परिसराची ओळख आहे.

वसंत व्हॅली, खडकपाडा, कल्याण (प)

खाडीकिनाऱ्यामुळे प्राचीन बंदर असणारे कल्याण शहर ऐतिहासिक परंपरेबरोबरच पर्यावरणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. मुंबईच्या परिघातील इतर शहरांप्रमाणेच कल्याण शहराचा झपाटय़ाने विस्तार होऊ लागला आहे. आकाशाला गवसणी घालणारे उंचच उंच टॉवर शहरात उभारले जाऊ लागले आहेत. त्यातील अनेक संकुले हिरव्या वनश्रीने नटलेली, पर्यावरणाचा आब राखलेली आहेत. खडकपाडा परिसरातील वसंत व्हॅली त्यापैकी एक आहे.

ठाण्यात घोडबंदर परिसर जसा नवे ठाणे म्हणून विकसित झाला, तशीच कल्याणमध्ये खडकपाडा परिसराची ओळख आहे. आधुनिकतेची कास धरलेले हे नवे कल्याण रेल्वे स्थानकापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे. याच परिसरात वसंत व्हॅली हे निवासी संकुल सुमारे सहा एकर जागेत उभे राहिलेले आहे. त्यात १४ मजल्यांचे चार आणि १९ मजल्यांचे दोन टॉवर आहेत. २००७ मध्ये संकुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले. येथे  ५२० सदनिकांमधून सुमारे तीन हजार रहिवाशी राहतात. कल्याण पश्चिम येथील खडकपाडा परिसर १५ ते २० वर्षांपूर्वी ग्रामीण परिसर होता. वळसा घालून वाहणारी गंधारी नदी, हिरवेगार निसर्गसौंदर्य, शुद्ध हवा, जवळच असलेला ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला असे आल्हाददायकवातावरण येथे होते आणि आजही काही प्रमाणात आहे. काहीसा डोंगराळ आणि खडकाळ असलेला भाग आजही येथे दिसून येतो. थोडक्यात नवे कल्याण वसविण्यासाठी ही जागा अतिशय उपयुक्त होती. त्यामुळे नव्वदच्या दशकात बांधकाम व्यावसायिकांनी आपला मोर्चा या परिसराकडे वळविला. या परिसरात आज ठिकठिकाणी अवाढव्य जागेत उंच निवासी संकुले उभारली गेली आहेत. काही ठिकाणी कामेही जोरात सुरू आहेत. संकुलाच्या किंमती आज कोटय़वधी रुपयांच्या घरात गेल्या आहेत. वसंत व्हॅली हे संकुल ज्या जागेत उभारले गेले आहे. तो भागही डोंगराळच आहे. मात्र या डोंगराचे सपाटीकरण न करता त्याच्या उंचवटय़ावर योग्य पद्धतीने नियोजनबद्धरीत्या हे संकुल उभारण्यात आले आहे. सहा एकर भव्य जागेत सहा टॉवर उभे करण्यात आले आहेत. फिरण्यासाठी भरपूर मोकळी जागा, विस्तीर्ण वाहनतळ, विविध फळाफुलांनी आणि शोभिवंत झाडांनी वेढलेले हे संकुल बाहेरून येणाऱ्याला प्रथमदर्शनी हेवा वाटावे असे आहे. येथे तीन मजली वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. मोकळे आणि प्रदूषणमुक्त वातावरण असल्याने शुद्ध हवेचा आस्वाद घेत चालत जाण्यामध्ये एक वेगळा आनंद येथे अनुभवता येतो, असे येथील रहिवाशी सांगतात. उंचावरील सदनिकेच्या खिडकीतून वा बाल्कनीमधून डोकावल्यास वाहणारी गंधारी नदी, महामार्ग, पहाडी भागासह नियोजनबद्ध उभारण्यात आलेली निवासी संकुले पाहावयास मिळतात. शेजारीच गोदरेज कॉलनी वसली आहे. येथून कल्याण शहरावर एक दृष्टिक्षेप टाकता येतो.

एकत्र कुटुंबासाठी प्रशस्त घरे

वसंत व्हॅली निवासी संकुल सर्व सुविधांनी युक्त असे आहे. वाहनतळाच्या तीन मजली प्रशस्त व्यवस्थेसह दुमजली क्लब हाऊसही आहे. या क्लब हाऊसमध्ये अत्याधुनिक साहित्यांसह व्यायामशाळा आहे. या क्लब हाऊसमध्ये वाढदिवस, हळदीकुंकू, साखरपुडा, स्नेहसंमेलन यांसारखे छोटेखानी कार्यक्रम करता येतात. त्याचप्रमाणे टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम यांसारखे अंतर्गत खेळही उपलब्ध आहेत. संकुलात पोहण्याचा तलाव आहे. त्याचप्रमाणे आगीसारखी काही दुर्घटना घडल्यास प्रत्येक टॉवरमध्ये एक मजला अग्निशमन यंत्रणेसाठी राखून ठेवला आहे. तसेच आणीबाणीची वेळ आलीच तर एका टॉवरमधून शेजारच्या दुसऱ्या टॉवरमध्ये जाण्यासाठी सुटकेचा मार्गही ठेवण्यात आला आहे. संकुलातील अंतर्गत रस्ते प्रशस्त आणि काँक्रीटचे आहेत. टू बीचकेसह थ्रीजी होमची सुविधाही देण्यात आली आहे. वडील, मुलगा, नातू अशा तीन पिढय़ांचे घनिष्ठ नातेसंबंध टिकून राहावे यासाठी थ्रीजी होम म्हणजे तीन रूम्स असलेल्या आलिशान सदनिकाही येथील टॉवरमध्ये आहेत. पॉवर बॅकअप असलेल्या अत्याधुनिक तंत्राने तयार केलेल्या लिफ्ट तसेच सौर ऊर्जेचाही वापर करण्यात आला आहे. त्याचा वापर घरातील गरम पाण्यासाठी होतो. सांडपाणी वाहून जाण्याच्या व्यवस्थेलाही अत्याधुनिक यंत्रणेचा स्पर्श आहे. पाणीपुरवठाही २४ तास आहे. सुरक्षेच्या दृष्टीने जागोजागी सीसीटीव्हीसह २४ तास सुरक्षारक्षक तैनात ठेवण्यात आले आहेत. इंटरकॉमची सुविधा असून घरकाम करणाऱ्यांना त्यांचे ओळखपत्र देण्यात आले आहे, अशी माहिती वसंत व्हॅलीचे संजय किमतानी यांनी दिली. भक्तिभाव जोपासला जावा यासाठी संकुलात संगमरवरी शिवमंदिरही बांधण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मुलांना खेळण्यासाठी तसेच त्यांचे पालक आणि रहिवाशांसाठीही उद्यान आहे.

‘मानवी स्पायडरमन’चा थरार

ट्रेकर्सना नेहमीच उंच मनोरे आव्हान देत असतात. इंडियन स्पायडरमॅन म्हणून ओळख असलेल्या गौरव शर्माने वसंत व्हॅलीतील १९ मजली इमारत यशस्वीरीत्या सर केली आहे. रॅपलिंगद्वारे त्यांनी इमारतीचे शिखर गाठले. तो रोमांचक थरार पाहण्यासाठी कल्याणकरांनी मोठय़ा संख्येने गर्दी केली होती.

सार्वजनिक सुविधांचा लाभ

कल्याण रेल्वे स्थानकापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर वसंत व्हॅली आहे. द्रुतगती महामार्ग जवळच असल्याने येथूनच नाशिकला थेट जाता येते. त्याचप्रमाणे पडघामार्गे ठाणे, मुंबईलाही जाता येते. नवी मुंंबईला जायचे झाल्यास बेस्टच्या वातानुकूलित बसेसची सुविधा येथे आहे. वसंत व्हॅली येथूनच त्या बसेस सुटत असल्याने त्याचा पूर्णपणे लाभ घेता येतो, असे येथील सुमन सिंग यांनी सांगितले. शाळा, महाविद्यालये जवळच आहेत. तसेच विद्यापीठाचे उपकेंद्रही जवळच आहे. प्रादेशिक परिवहन विभागाची वाहनचालक चाचणी घ्यावयाची झाल्यास येथील परिसराला ते प्राधान्य देतात. एकंदरीत नवे कल्याण शहर असल्याने रुग्णालये, घाऊक बाजारपेठा, दवाखाने, वाहतूक व्यवस्था चांगली आहे. विस्तीर्ण आणि खड्डेविरहित रस्त्यांमुळे येथील प्रवास आल्हाददायक ठरतो.

सामाजिक सलोख्यासह  आरोग्य धनसंपदा

संकुलात मराठी, गुजराती, सिंधी, उत्तर भारतीय, दाक्षिणात्य, ख्रिश्चन आदी विविध भाषिक आणि धर्मीय लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, कोजागिरी पौर्णिमा, गुढीपाडवा, दिवाळी, होळी आदी सण, उत्सव साजरे केले जातात. त्यातून ऐक्याचे दर्शन घडते, असे सचिव ब्रिजबिहारी शर्मा यांनी सांगितले. आरोग्य संवर्धनासाठी येथील रहिवाशी शैला कपोते यांनी येथे विनामूल्य हास्य क्लब सुरू केला आहे. पहाटेच्या सुमारास मोकळ्या जागेत संकुलातील रहिवाशी उत्स्फूर्तपणे या हास्य दरबारात सहभागी होऊन मनमुरादपणे हास्याचा आनंद लुटतात. योग साधनाचे धडेही येथे दिले जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 1:05 am

Web Title: vasant valley khadakpada kalyan
Next Stories
1 वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीकामाला मुहूर्त मिळेना
2 नामवंतांचे बुकशेल्फ : शब्दांनी सामथ्र्य दिले!
3 वसई किल्ल्याला मद्यपींचा वेढा
Just Now!
X