22 April 2019

News Flash

भाज्या महागल्या, फुलेही वधारली

उत्तम प्रतीचा भरपूर भाजीपाला वाशी आणि कल्याणच्या घाऊक बाजारांमध्ये दररोज येत आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

किरकोळ बाजारात मटार, वांग्याचे दर तिप्पट-चारपट

भाग्यश्री प्रधान, ऋषीकेश मुळे, ठाणे : घाऊक बाजारात महत्त्वाच्या भाज्यांचे दर स्थिर असताना गणेशोत्सव आणि इंधन दरवाढीचे कारण पुढे करीत किरकोळ विक्रेत्यांनी रविवारपासून सर्वच भाज्यांचे दर किलोमागे किमान २० ते ३० रुपयांनी वाढवले आहेत. किरकोळ व्यापाऱ्यांनी वांगी आणि मटारचे दर तर तिप्पट-चौप्पट केले आहेत. फुलांचेही दर चढत आहेत.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तम प्रतीचा भरपूर भाजीपाला वाशी आणि कल्याणच्या घाऊक बाजारांमध्ये दररोज येत आहे. त्यामुळे घाऊक बाजारात महत्त्वाच्या भाज्यांचे दर अजूनही स्थिर आहेत. मात्र, गणेशोत्सव आणि इंधन दरवाढीआडून मुंबई आणि ठाण्यातील किरकोळ विक्रेत्यांनी ग्राहकांचे खिसे कापायला सुरुवात केली आहे.

ऋषिपंचमीच्या उपवासासाठी आवश्यक असलेल्या मका, फ्लॉवर, फरसबी, गवार, शेंगदाणा, वाटाणा, सुरण या भाज्यांची दरवाढ किरकोळ बाजारात झाली आहे. मागील महिन्यात घाऊक बाजारात ३० रुपये किलोने मिळणारा वाटाणा सध्या ७० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. किरकोळ बाजारात काही ठिकाणी तो १६० रुपये किलोनेही विकला जात आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी येथील घाऊक बाजारात आणि कल्याण कृषी-उत्पन्न समितीच्या घाऊक मंडईत उत्तम दर्जाचा फ्लॉवर १८ रुपये किलोने विकला जात असला तरी ठाण्यातील जांभळी नाका आणि नौपाडय़ातील किरकोळ बाजारपेठेत उत्तम प्रतीच्या फ्लॉवरचे दर ८० रुपयांपर्यत पोहचले आहेत.

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई तसेच आसपासच्या परिसरात प्रामुख्याने पुणे तसेच नाशिक जिल्ह्य़ातून भाजीपाल्याची आवक होते. गेल्या दोन दिवसांत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी आणि कल्याण बाजारात भाज्यांची सरासरी आवक झाली आहे. तरीही घाऊक बाजारात काही भाज्यांचे दर किलोमागे पाच ते सहा रुपयांनी वाढले. जुन्नर, नाशिक भागात शेतकरी पोळा सण साजरा करण्यात गुंतल्याने भाज्यांची खुडणी झाली नाही. परिणामी घाऊक बाजारात दरवाढ झाली. कल्याण आणि वाशी येथील कृषी बाजार आवारात वाटाणा आणि गवार या भाज्यांचे दर किंचित वाढले. मात्र या अल्प दरवाढीला गणेशोत्सवाचे निमित्त देत किरकोळ विक्रेत्यांनी अव्वाच्या सव्वा दराने भाजी विक्री सुरू केल्याचे चित्र सोमवारी अनेक बाजारांमध्ये दिसले.

फळेही महाग

नवी मुंबई : गणेशोत्सवानिमित्त फळांची मागणी वाढल्याने घाऊक बाजारात त्यांची दरवाढ झाली आहे. त्यातही सफरचंद, मोसंबी आणि डाळींब जास्त भाव खात आहे.

गणेशोत्सवात सजावट साहित्याबरोबर अधिक मागणी असते ती फळांना. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुंबई आणि कोकणात फळांचा पुरवठा होतो. गणेशोत्सव आल्याने बाजार समितीत फळांची मागणी वाढली आहे. परिणामी त्यांची दरवाढ झाली आहे.

घाऊक बाजारात २५-३० किलो सफरचंदाचा भाव १८०० ते २२०० रुपये होता तो आता १८०० ते २५०० असा झाला आहे. डाळिंबाच्या घाऊक दरात १५ ते २० रुपयांची वाढ झाली आहे. डाळिंबाचा घाऊक बाजारातील किलोचा दर ६५ वरून ८० रुपयांवर गेला आहे. मोसंबीचा आठ डझनाचा दर ८०० ते १००० रुपये होता. त्यात आता १०० ते २०० रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारातील फळांचे दर एक-दोन दिवसांत वाढतील असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

सणांमध्ये फळांना अधिक मागणी असते. मुंबईसह कोकणातील ग्राहक गणेशोत्सवात सफरचंद, डाळिंब यांची खरेदी अधिक करतात. त्यामुळे घाऊक बाजारात ती तेजीत आहेत.

-संजय पिंपळे, घाऊक फळविक्रेता

मसाल्याचे पदार्थ कडाडले

केरळमधील महापुरामुळे मसाल्यांच्या पदार्थाची आवक घटल्याने सुरूझालेली दरवाढ अजूनही कायम आहे. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपर्यंत वेलची तसेच इतर पदार्थाची ५० टक्के आवक कमी झाली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात काही पदार्थाच्या दरांनी तर टोक गाठले आहे. घाऊक बाजारात १६०० रुपये किलोने मिळणारी केरळी वेलची ठाण्यातील किरकोळ बाजारात ३५०० रुपये किलोने विकली जात आहे. त्याचबरोबर काळीमिरी, जायपत्र, जायफळ, तमालपत्र या पदार्थाच्या भावातही ५० ते ६० रुपयांनी वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. केरळमधील अतिवृष्टीमुळे मसाले, केळी, नारळांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मसाल्याचे भाव आणखी काही दिवस चढेच राहतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथून मसाल्यांच्या पदार्थाची आवक व्यवस्थित होत आहे. वेलचीच्या दरात मात्र १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती वाशी कृषी उत्पन्न समितीतील मसाले व्यापारी कीर्ती राणा यांनी दिली. केळ्याचे वेफर्स बनविण्यासाठी लागणारी खास मोठी केळी किलोमागे ३०-४० रुपयांनी महागली आहेत. परिणामी केळ्याच्या वेफर्सचे दरही ३० ते ४० रुपयांनी वाढले आहेत. केरळमधून केळ्यांची आवक फारशी होत नसल्याची माहिती केरळचे केळ्यांच्या वेफर्सचे घाऊक व्यापारी एम. डी. अ‍ॅलेक्स यांनी दिली.

* वाटाण्याचे दर घाऊक बाजारात किलोमागे ३० रुपयांनी वाढताच काही ठिकाणच्या किरकोळ बाजारांमध्ये वाटाणा १५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

* घाऊक बाजारात १६ रुपये किलोने मिळणारी वांगी किरकोळ बाजारात ८० रुपयांना विकली जात आहेत.

* पालेभाज्यांची आवक साधारणपणे लातूर, नाशिक आणि पुणे जिल्ह्य़ातून होते. त्या ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका पालेभाज्यांना बसल्याची माहिती कल्याण कृषी बाजार समितीचे यशवंत पाटील यांनी दिली.

वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ पाच टक्केच माल केरळवरून आयात होतो. इतर राज्यातूनही मसाल्याचे पदार्थ येतात. तर काही प्रमाणात हे पदार्थ अन्य देशांतून आयात करण्यात येतात. शुक्रवारी अडीच क्विंटल वेलची बाजारात उपलब्ध होती, तर ५० क्विंटल जायफळ, २१ क्विंटल जायपत्राची आवक झाली.

– डी. जी. माकोडे, उपसचिव, वाशी मसाला बाजार समिती

First Published on September 11, 2018 4:17 am

Web Title: vegetable and flowers prices hike in kalyan market