मुंबई, ठाण्यातील बाजारांपेक्षा मॉल, सुपरमार्केटमध्ये किफायतशीर दरात भाजी
कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपामुळे एकीकडे मुंबई, ठाण्यातील किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरांनी शंभरी गाठली असताना थेट शेतकऱ्यांकडून भाजीमाल खरेदी करणाऱ्या मॉल तसेच सुपरमार्केटमध्ये मंडईपेक्षा कमी दराने भाज्या विकल्या जात आहेत. किरकोळ बाजारात टोमॅटो १०० ते १२० रुपये किलो दराने विकला जात असताना काही मॉलच्या सुपरमार्केटमध्ये तो ४९ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होत आहे. त्यामुळे ग्राहकांची पावले मंडयांऐवजी मॉलकडे वळू लागली आहेत, तर या संधीचा फायदा घेत मॉल व्यवस्थापनांनीही ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या सवलती तसेच ऑफर्सचे संदेश पाठवण्यास सुरुवात केली आहे.
tv19भाजीपाला शेतातून थेट ग्राहकाच्या दारात आणण्यास परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात एपीएमसीमधील भाजीपाला व्यापाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे मुंबई, ठाण्यात भाजीटंचाई निर्माण झाली आहे. याचा फायदा घेत किरकोळ बाजारातील दर दुपटीने वाढवण्यात आले आहेत. अनेक भाज्यांचे दर शंभराहून जास्त झाल्याने सर्वसामान्य हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत मॉल आणि सुपरमार्केट ग्राहकांना उपयुक्त ठरू लागले आहेत. अलीकडच्या काळात मॉलमधून किराणा सामानासोबत भाजीपाला खरेदीकडेही ग्राहकांचा कल वाढला आहे. मॉलमध्ये नाशवंत पदार्थाची विक्री केली जात असून रोजच्या रोज ताजा माल मिळत असल्याने अनेक ग्राहक तेथून खरेदी करतात. व्यवस्थित पॅकिंग आणि उत्तम दर्जा यांमुळे मंडईपेक्षा मॉलमधील भाज्यांचे दर जास्त असतात; परंतु सुरू असलेल्या एपीएमसी संपाच्या काळात हे मॉलच ग्राहकांसाठी अधिक स्वस्त ठरत आहेत.
पूर्वी दसरा-दिवाळी किंवा स्वातंत्र्य दिन यांसारख्या दिवसांचा किंवा मान्सून सेल, समर ऑफर ऋतूचा मुहूर्त साधून आकर्षक योजना ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या जात. मात्र आता एपीएमसी ‘बंद’चा मुहूर्त साधून ग्राहकांना मॉलकडे वळविण्यासाठी मेसेजसारख्या प्रभावी माध्यमांचा वापर केला जात आहे. ‘स्टार बाझार’सारख्या मॉल व्यवस्थापनांनी तर भाज्यांचे दर सांगणारे संदेश मोबाइलवरून
ग्राहकांना पाठवण्यास सुरुवात केली आहे. ‘प्रिय, ग्राहक कृषी उत्पन्न बाजर समितीचा बंद असूनही, आम्ही तुमच्यासाठी उत्तम प्रतीची फळे आणि भाजीपाला किफायतशीर दरात देऊ’, असे संदेश ग्राहकांना मोबाइल तसेच इंटरनेटच्या माध्यमातून पाठवण्यात येत आहेत.
‘ग्राहकांना उत्तम प्रतीचा भाजीपाला आणि फळे किफायतशीर किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत असतो. बाजार समितीने बंद पुकारला असूनही आम्ही बाजारभावापेक्षा कमी दरात भाज्या, फळे उपलब्ध करून देऊ शकतो. आम्ही शेतकऱ्यांकडून थेट शेतमाल खरेदी करतो. त्यामुळे माफक दरात भाज्या देणे परवडते,’ असे ‘स्टार बाझार’चे संचालक दीपक साहू यांनी सांगितले.

Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना
repair work of creek bridge on uran panvel road completed
उरणच्या खाडीपूल दुरुस्तीचे काम पूर्ण; ‘हाइट गेट’ हटवण्याची प्रतीक्षा; चार गावांतील हजारो नागरिकांना दिलासा
Recovery of 605 crores for house rent action of Zopu authority is shock to developers
घरभाड्यापोटी ६०५ कोटींची वसुली, ‘झोपु’ प्राधिकरणाच्या कारवाईचा विकासकांना धसका
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास