12 December 2018

News Flash

ओल्या कचऱ्यावर भाज्यांची लागवड

खड्डय़ांच्या साहाय्याने ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास सुरुवात करण्यात आली.

आशीष दामले यांनी केलेल्या एका आगळ्यावेगळ्या प्रयोगाला पाहण्यासाठी सध्या नागरिक गर्दी करत आहेत.

बदलापुरातील प्रयोग, कचऱ्यापासून तयार खतावरच शेती

स्वच्छ सर्वेक्षणाने सर्व यंत्रणा कमालीच्या वेगाने कामाला लागल्या असून त्यातून अनेक प्रयोग आता समोर येऊ  लागले आहेत. बदलापुरातील प्रभाग क्रमांक नऊमधील नगरसेवकानेही अशाच प्रकारे एका प्रयोगातून कचऱ्यापासून खतनिर्मितीच्या खड्डय़ावर थेट पालेभाज्यांची लागवड केली आहे. त्यामुळे काही तरी परतावा मिळण्याच्या आशेने आता नागरिकांनीही कचरा विलगीकरून या खतनिर्मिताला प्रतिसाद दिला आहे.

देशभरात सुरू झालेल्या स्वच्छ भारत अभियानात स्वच्छता वाढावी यासाठी स्वच्छ सर्वेक्षणाची सुरुवात करण्यात आली. त्यात सध्या नगरपालिकेतील प्रभागांचाही समावेश असून स्थानिक नगरसेवकांनीही यात विविध प्रयोग राबवण्यास सुरुवात केली आहे. बदलापूर नगरपालिकेतील प्रभाग क्रमांकनऊमधील नगरसेवक आशीष दामले यांनी केलेल्या एका आगळ्यावेगळ्या प्रयोगाला पाहण्यासाठी सध्या नागरिक गर्दी करत आहेत. आपल्या प्रभागातून जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उच्चदाब वाहिन्यांच्या खाली असलेल्या पडीक जागेचा त्यांनी वापर सुरू केला. त्यात खड्डय़ांच्या साहाय्याने ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यातून जमिनीचा पोतही सुधारला आणि खताची निर्मितीही सुरू झाली. या खताचे वाटप आसपासच्या नागरिकांना केले जाणार आहे. मात्र त्याचे प्रमाण पाहता त्याचा वापर तिथेच व्हावा या हेतूने तिथे भाज्यांची लागवड करण्यास सुरुवात झाली आहे. सध्या इथे पालेभाज्यांची लागवड केली असून येत्या काही दिवसांत तेथून चांगल्या भाज्या उपलब्ध होणार आहे. त्यांचे वाटपही कचऱ्याबाबत आदर्श निर्माण करणाऱ्या सोसायटय़ांमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती आशीष दामले यांनी दिली आहे.

कचऱ्यासह जुन्या वृक्षांना जीवदान देत त्यांची रंगरंगोटी करत त्यांचे रूप पालटण्यात आले आहे. तसेच प्रभागातील बहुतेक इमारतींनी प्लास्टिकमुक्ती केली असून गोळा केलेल्या प्लास्टिकवर येत्या काळात प्रक्रिया करण्याची यंत्रणा उभारण्याचा मानस आहे.

      – आशीष दामले, नगरसेवक

First Published on March 14, 2018 4:35 am

Web Title: vegetable planting on manure pits in badlapur