पावसाचे कारण देत भाज्यांच्या दरांत अवाच्या सवा वाढ

ठाणे : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे गेल्या काही दिवसांपासून घाऊक बाजारात भाज्यांच्या किंमतीत चढ-उतार सुरू असले तरी किरकोळ बाजारात मात्र ग्राहकांची मोठी लूट सुरू झाली आहे. पावसाचे कारण पुढे करत जवळपास सर्वच भाज्यांचे दर अवाच्या सव्वा वाढविण्यात आले असून या दरवाढीवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने ग्राहक भरडून निघत आहेत. घाऊक बाजाराच्या तुलनेत किरकोळीत काही भाज्यांचे दर किलोमागे २० ते ५० रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहेत.

मुंबई, ठाणे तसेच उपनगरांतील बाजारपेठांमध्ये भाज्यांची आवक महिनाभरापूर्वी घटल्याने घाऊ क आणि किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याचे चित्र होते. काही काळानंतर भाज्यांची आवक स्थिरावल्याने घाऊ क बाजारातील दर नियंत्रणात आले आहेत. राज्यातील विविध भागांत झालेल्या परतीच्या पावसामुळे भाजी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे तसेच उपनगरांतील भाज्यांची आवक ५० टक्कय़ांनी मंदावली आहे. यामुळे घाऊक बाजारातही काही प्रमाणात दरवाढ झाली असली तरी किरकोळ विक्रेते मात्र अवाच्या सवा दराने भाज्यांची विक्री करू लागले आहेत. घाऊ क भाजी बाजारात ३० ते ३५ रुपये किलो दराने मिळणारा कोबी किरकोळ विक्रेते ८० रुपयांना विकतात. ३० ते ६५ रुपये किलो या दराने मिळणाऱ्या फ्लॉवर, गवार, शिमला मिरचीच्या दरांनी तर किरकोळीत शंभरी गाठली आहे. एरवीच्या तुलनेत या भाज्यांचे घाऊक बाजारातील दरही चढेच असले तरी किरकोळीत मात्र परतीच्या पावसाचे भांडवल केले जात आहे.

‘आवक स्थिरावल्याने दर कमी’

परतीच्या पावसामुळे भाज्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारातील भाज्यांची आवक घटली असली तरी, ज्या वेळेस पाऊ स पडत नाही तेव्हा भाज्यांची आवक उत्तम होत असते. त्यामुळे भाज्यांचे दर हे कमी जास्त होत असतात. गेल्या काही दिवसांपासून भाज्यांची आवक स्थिरावू लागली आहे, त्यामुळे दरही कमी होऊ लागले आहेत, अशी माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजी बाजारातील अधिकारी आर. के. राठोड यांनी दिली.

परतीच्या पावसामुळे भाज्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक घटली असून त्यांच्या दरात वाढ झाली आहे.

– रमेश वर्मा, भाजी विक्रेते, ठाणे.

भाज्यांचे दर

भाज्या     घाऊक       किरकोळ

भेंडी                ४४          ८०

गवार              ६५        १२०

फरसबी          ६५          १२०

फ्लॉवर            ३०        १२०

कोबी               ३४         ८०

भाज्या       घाऊक               किरकोळ

टोमॅटो             ३५                ६०

वाटाणा           १५०              १६०

वांगी               ३४               १००

शि. मिरची         ५०            १००

(दर किलोमागे रुपयांत)