दुष्काळाच्या नावाने लूट; किरकोळ बाजारात दर १०० रुपयांवर

परराज्यातून भाजीपाल्याची मुबलक आवक होत असल्याने मुंबई, ठाण्याच्या घाऊक बाजारांमध्ये भाजीपाल्याचे दर आवाक्यात असले तरी किरकोळ बाजारात मात्र दुष्काळाच्या नावाने ग्राहकांची अक्षरश: लूट केली जात आहे. भेंडी, गव्हार, वाटाणा, मिरची, कोंथिबीर यांसारख्या भाज्यांनी किरकोळीत शंभरी गाठली असून, डाळींचे भाव वधारले असतानाच भाज्यांचा पर्यायही महाग झाल्याने ग्राहकांना घाम फुटला आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या परिसरात राज्यातील पुणे तसेच नाशिक जिल्ह्य़ांतून भाजीपाल्याचा पुरवठा होतो. कल्याण, डोंबिवलीसारख्या शहरांना मुरबाड, शहापूर परिसरातील स्थानिक शेतांमधील भाजीचा पुरवठा होत असला तरी तो फारच मर्यादित आहे. त्यामुळे पुणे, नाशिक जिल्ह्य़ांतील भाज्यांवर या शहरांची भिस्त असते. यंदा राज्यभर दुष्काळसदृश स्थिती असल्याने भाज्यांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम दिसू लागला आहे. त्यामुळे मुंबई, ठाण्यास सध्या गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली यांसारख्या राज्यांमधून होणाऱ्या भाजीपाल्याच्या पुरवठय़ावर अवलंबून राहावे लागत आहे.

वाशीतील घाऊक बाजारपेठेत दररोज ५०० ते ५५० गाडी भाजीपाल्याची आवक होत असते. त्यापैकी सुमारे २२५ ते २५० वाहने परराज्यातून येत आहेत, अशी माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शंकर िपगळे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

किरकोळ बाजारात चढे भाव

परराज्यातून होत असलेल्या पुरवठय़ामुळे अजूनही घाऊक बाजारात भाज्यांचे दर आवाक्यात आहेत. किरकोळीत मात्र दुष्काळाच्या नावाने ग्राहकांची लूट सुरु आहे. उत्तम प्रतीची भेंडी या बाजारात १०० ते ११० रुपये किलो दराने विकली जाऊ लागल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. वाशी-कल्याणच्या घाऊक बाजारात हीच भेंडी २७ ते ३८ रुपये किलो या दराने विकली जात असताना किरकोळीत झालेली ही वाढ कृत्रिम असल्याची चर्चा आहे.

किरकोळ भाज्यांचे दर

गवार – १०० रुपये किलो

भेंडी – ८० ते १००रुपये किलो

हिरवी मिरची- १२० रुपये किलो

वाटाणा- १२० रुपये किलो

कोबी-४० ते ५० रुपये किलो

घेवडा-६० रुपये किलो

भोपळी मिरची- ४० रुपये किलो

मेथी जुडी-४० रुपये