टोमॅटोपासून गवापर्यंत सर्वच भाज्यांच्या घाऊक बाजारातील किमती निम्म्यावर
धान्यबाजारातील महागाईने त्रस्त झालेल्या ग्राहकांना गेल्या महिनाभरापासून भाजीबाजारात मात्र स्वस्ताईचा प्रत्यय येत आहे. एकीकडे आवक वाढल्यामुळे मेथी, शेपू, पालक, माठ अशा पालेभाज्या स्वस्त झाल्या असतानाच गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो, फ्लॉवर, गाजर, भेंडी, कारली, वांगी या भाज्यांच्या किमतीही निम्म्यावर घसरल्या आहेत. वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक मंडईत उत्तम दर्जाचा टोमॅटो आठ रुपये किलोने विकला जात असून गाजर, फ्लॉवरच्या किमतीही सहा रुपयांपर्यंत खाली आल्या आहेत. घाऊक बाजारातील स्वस्ताई किरकोळ बाजारातही डोकावू लागली असून येथेही भाज्या स्वस्त झाल्या आहेत.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या परिसरात प्राधान्याने पुणे तसेच नाशिक जिल्ह्य़ांमधून भाजीपाल्याची आवक होत असते. यंदा पावसाने ओढ दिल्याने राज्यातील विविध भागांमध्ये दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाचे तीन-चार महिने संपताच भाज्यांचे दर गगनाला भिडू लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. विशेष म्हणजे, येऊ घातलेल्या दुष्काळाच्या नावाने नोव्हेंबर महिन्यातच प्रमुख भाज्यांच्या किमती वाढू लागल्याने ग्राहकांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत होत्या. गेल्या महिनाभरापासून मात्र हे चित्र बदलू लागले असून राज्यभर पसरलेल्या थंडीच्या दुलईचा हा सकारात्मक परिणाम असल्याची प्रतिक्रिया मुंबईतील घाऊक बाजारांमध्ये उमटू लागली आहे. या दोन्ही जिल्ह्य़ांमधून मुंबईस होणारी भाजीपाल्याची आवकही मोठय़ा प्रमाणावर वाढली असून त्यामुळे दर घसरू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत पुणे, नाशिक तसेच सातारा जिल्ह्य़ांमधून मुंबईच्या बाजारात होणारी भाजीपाल्याची आवक फारशी समाधानकारक नव्हती. त्यामुळे गुजरात, मध्य प्रदेश यासारख्या राज्यांमधून होणाऱ्या भाज्यांच्या आवकेवर मुंबई, ठाणे, नवी मुंबईकरांना गुजराण करावी लागत होती. जानेवारीच्या अखेरीस हे चित्र बदलू लागले आहे. पुणे जिल्ह्य़ातील चाकण, नारायणगाव, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातून भाज्यांनी भरलेली वाहने मोठय़ा संख्येने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या भाजीपाला बाजारात दाखल होऊ लागली आहेत, अशी माहिती घाऊक व्यापारी गोपीनाथ मालुसरे यांनी ‘ठाणे लोकसत्ता’ला दिली. टॉमेटोने गेल्या दोन वर्षांत सर्वात कमी दर नोंदविला असून भेंडी, वाटाण्याच्या दरांमुळे व्यापारी काहीसे धास्तावल्याचे चित्र दिसू लागले आहे. वाशी येथील घाऊक बाजारात सध्या सर्वात महाग भाजी गवार असून तिचा दरही किलोमागे ३० ते ३६ रुपयांच्या आसपास आहे. गेल्या वर्षभरात घाऊक बाजारात प्रथमच अशाप्रकारे स्वस्ताईचा हंगाम अवतरला आहे, अशी प्रतिक्रिया भानुदास डुंबरे या व्यापाऱ्याने दिली.