मंडईतील गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय

ठाणे : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असतानाही ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांतील नागरिक भाजी मंडईमध्ये भाजीपाला खरेदीसाठी गर्दी करीत आहेत.  ही गर्दी टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून या शहरांतील सर्वच चौकांमध्ये किरकोळ विक्रेत्यांमार्फत भाजीपाला आणि फळे उपलब्ध करून द्यावीत, अशा सुचना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्या आहेत. त्यामुळे या सर्व शहरातील नागरिकांना त्यांच्या घराच्या जवळ रास्त भावात भाजीपाला आणि फळे खरेदी करता येणार आहे.

नागरिक भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी भाजी मंडईमध्ये मोठी गर्दी करत आहेत. त्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन होत असून नागरिकांच्या गर्दीमुळे करोना विषाणू संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्हाप्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मंगळवारी जिल्हातील ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांना किरकोळ हातगाडी विक्रेत्यांच्या मार्फत शहरातील चौकाचौकांमध्ये भाजीपाला आणि फळे रास्त भावात उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्था प्रशाससनानेही या आदेशाची आमलबजावणी सुरू केली असून त्यामुळे शहरांतील सर्वच नागरिकांना त्यांच्या घराजवळ रास्त भावात भाजीपाला आणि फळे खरेदी करता येणार आहेत.

‘घरपोच किराणा’साठी नियोजन करा!

शहरांमधील सर्वच किराणामालाची दुकाने नियमितपणे सुरू राहणार आहेत. बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक साठा शिल्लक आहे. उगीचच घाबरून जावून साठा करून ठेवू नका. किरकोळ दुकानदार, व्यापारी यांनी नागरिकांना घरपोच किराणा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे तसेच नागरिकांनी थेट दुकानात जावून खरेदी करण्यापेक्षा यादी तयार करून पाठवावी. तसेच दुकानदाराने दिलेल्या वेळी जावून सामानाची उचल करावी. जेवढी गर्दी टाळणे शक्य तेवढी गर्दी टाळा, सुरक्षित अंतर राखा आणि प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी नागरिकांना केले.

किरकोळ विक्रेत्यांनीही भाजीपाला खरेदी करण्यासाठी भाजी मंडईमध्ये एकाच वेळी गर्दी करू  नये. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना जिल्हाप्रशासनातर्फे सुचना देण्यात आल्या आहेत. शहरातील सर्वच भाजीपाल्याचा पुरवठा नियमित सुरू  राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.

राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी