News Flash

स्वस्ताईत ‘किरकोळ’ विघ्न!

घाऊक बाजारपेठेत उत्तम प्रतीचा टोमॅटो बुधवारी सहा रुपये किलो या दराने विकला जात होता.

घाऊक बाजारात भाज्यांचे दर घसरूनही किरकोळ बाजारात महागाई कायम
वाशी आणि कल्याण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक २५ टक्क्यांनी वाढल्याने घाऊक बाजारातील भाज्यांचे दर लक्षणीयरीत्या घटले आहेत. गवार, भेंडी, फरसबी, टॉमेटो, वांगी, ढोबळी मिरची अशा सर्वच भाज्यांचे दर कमी झाले आहेत. फ्लॉवर, कोबी, काकडी यांसारख्या भाज्या तर किलोमागे दहा रुपयांनी विकल्या जात आहेत. मात्र किरकोळ व्यापाऱ्यांच्या नफेखोरीमुळे दरांची ही घसरण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकलेली नाही.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत येणाऱ्या वाशी येथील घाऊक बाजारपेठेत उत्तम प्रतीचा टोमॅटो बुधवारी सहा रुपये किलो या दराने विकला जात होता. टोमॅटोची आवक कमालीची वाढल्याने दोन गाडय़ांमधील माल फेकून द्यावा लागला, अशी माहिती बाजार समितीमधील वरिष्ठ सूत्रांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे भाज्यांची आवक वाढल्याचे चित्र आहे. दोन दिवसांपूर्वी पालकची एक जुडी वाशीच्या घाऊक बाजारात अवघ्या चार रुपयांनी विकली जात होती. याशिवाय भेंडी, दुधी भोपळा, फ्लॉवर, गाजर, गवार, कारली, टॉमेटो, तोंडली, मेथी यांच्या दरातही चांगलीच घट झाली आहे. नाशिक आणि पुणे जिल्ह्य़ात होणाऱ्या पावसामुळे आवक चांगली होत आहे, अशी माहिती एपीएमसी बाजारातील व्यापारी गोपीनाथ मालुसरे यांनी दिली.
घाऊक बाजारात स्वस्ताई अवतरली असली तरी किरकोळ बाजारात दुष्काळाचा बागुलबुवा करून चढय़ा दरानेच भाज्या विकल्या जात आहेत. मध्यंतरी स्थानिक संस्था करामुळे भाजी महाग असल्याची ओरड किरकोळ विक्रेत्यांनी सुरू केली होती. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील प्रमुख भाजी मंडयांमध्ये भेंडी, गवार, फरसबी, शेवगा शेंग, वांगी, फरसबी अशा प्रमुख भाज्या ६० रुपये किलो अशा ‘फिक्स रेट’ने विकल्या जाऊ लागल्या आहेत. घाऊक बाजारातील भाज्यांचे दर आणि किरकोळीचे दर यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे, अशी कबुली एपीएमसीतील वरिष्ठ सूत्रांनी दिली. घाऊक बाजारात हमाली, बाजार फी, वाहतूक खर्च तसेच मालाची नासाडीचे प्रमाण लक्षात घेतले तरी किरकोळ दरात तिपट्टीने वाढ योग्य नाही. ही ग्राहकांची लूट आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

कांदा मात्र महाग
कांद्याचे घाऊक दर अजूनही पन्नाशीच्या पुढे आहेत. वाशी आणि कल्याणातील घाऊक बाजारात कर्नाटकातील हुबळी कांदा येत असल्याने दर काहीसे कमी झाले असली तरी अजूनही उत्तम प्रतीचा कांदा ५३ रुपयांनी विकला जात आहे. किरकोळ बाजारातही कांद्याचे दर ८० रुपयांच्या आसपास आहेत. ओला आणि तुलनेने कमी प्रतीचा कांदा मात्र ७० रुपयांना मिळत आहे.
भाज्यांचे दर
भाजी             घाऊक       किरकोळ
भेंडी                ११ रु.        ६०रु.
दुधी भोपळा     ९ रु.         ६० रु.
फ्लॉवर            ८ रु.         ६० रु
गाजर              ८ रु.        ४० रु.
गवार               २५ रु.      ७० रु.
कारली              ६ रु.       ४८ रु.
टोमॅटो              १० रु.     ३० रु.
तोंडली              १२ रु.     ३० रु.
मेथी                 १० रु.     २० रु.
पालक              १० रु.     १५ रु.
(भाज्यांचे दर किलोमध्ये, पालेभाज्या जुडीप्रमाणे)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2015 2:43 am

Web Title: vegetables cost more in retail markets
Next Stories
1 भातुकलीचा खेळ मांडला!
2 पारंपरिक ‘सोवळ्या’ला पाश्चिमात्य साज
3 वाहने वाढली, वाहनतळासाठी मात्र शोधाशोध
Just Now!
X