माल विकत घेणारे किरकोळ विक्रेते घटले, भाज्या, फुलांच्या किमती घटल्या

पालिकेच्या फेरीवाला हटाव मोहिमेमुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला असला तरी वसईच्या शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. या फेरीवाल्यांनी वसईच्या शेतमालाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल तसाच पडून राहिला असून निम्म्या किमतीत भाज्या व फुले विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

वसईच्या पश्चिम पट्टय़ात मोठय़ा प्रमाणावर शेती होत असते. त्यात प्रामुख्याने फ्लॉवर, वांगी, मुळा, पालक, दुधी, गलके, केळी, नारळ तसेच मोगरा, जुई, सायली, कागडा, चाफा, तगर, तुळस आदी फुलांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला स्थानिक विक्रेते ज्यांना हातविक्रेतेही म्हटले जाते. ते विकत घेऊन मुंबईच्या बाजारात विकतात. यावर त्यांची उपजीविका चालते. परंतु आता मुंबई महापालिकेने फेरीवाल्यांविरोधात कडक कारवाई सुरू केल्याने या विक्रेत्यांना जागा मिळेनाशी झालेली आहे. त्यामुळे त्यांनी वसईच्या शेतकऱ्यांकडून माल विकत घेणे बंद केले आहे. परिणामी शेतकऱ्यांना बहुतांश माल तसाच पडून राहात असल्याचे वसईतील शेतकऱ्यांनी सांगितले.

भाव गडगडले, शेतकऱ्यांना आर्थिक फटका

वसईतील शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला आणि फुले हा माल हे हातविक्रेते थेट विकत घेतात. त्यात दलाल किंवा इतर व्यापाऱ्यांचा संबंध नसतो. आता या विक्रेत्यांनी जागा नसल्याचे कारण देत माल घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे जे विक्रेते थोडाफार माल घेतात त्यांना कमी दराने माल विकावा लागत आहे. त्याच्यामुळे भाव गडगडले आहेत. शंभर ग्रॅम नेवाळी पुडीसाठी २५ ते ३० रुपये बाजार भाव अपेक्षित असताना सध्या ५ ते ८ रुपये किंमत मिळत आहे. मजुरांना पाने खुडण्यासाठी पाच रुपये मजुरी दिली जाते. परंतु ही पानांची जुडी सध्या दोन ते तीन रुपयाला विकली जाते, अशी माहिती अर्नाळा शेतकरी सोसायटीचे संचालक भरत पाटील यांनी दिली. सोनचाफ्याचीही तीच गत आहे. सोनचाफा शंभर रुपये शेकडय़ाने विकला जात होता तो आज ५० ते ६० रुपयांनी विकला जात असल्याचे ते म्हणाले. भाजीपाल्यात फ्लॉवर, मिरची पाटीवर विकली जाते. घेणारे ग्राहक एकच पाटी घेतात, कारण जागा नसते. एक पाटी घेऊन विक्री करणे सोपे असते कारण कारवाई झाली तर एक पाटी घेऊन पळता येते, असे वसईतून भाजीपाला घेऊन मुंबईला विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले. वसईतील शेतकऱ्यांचा माल पूर्वी सकाळी १० वाजेपर्यंत विकला जायचा आता दुपारच्या अडीच-तीन वाजेपर्यंतही संपूर्ण माल विकला जात नसल्याची खंत विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

या आंदोलनानंतर शेतीतील पन्नास टक्के माल पडून राहात असून तो कवडीमोल भावाने द्यावा लागतो. फेरीवाल्यांवर निर्बंध हवेत परंतु वसईतला शेतमाल विकणारे फेरीवाले नसून स्थानिक नागरिक आहेत.

-किरण पाटील, शेतकरी, अर्नाळा