घाऊक बाजारात २ ते १०, किरकोळ बाजारात ५ ते ३० रुपयांनी महाग

 

ठाणे : मुंबई, ठाणे तसेच उपनगरांतील बाजारपेठांमध्ये भाज्यांची आवक घटल्यामुळे दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात जवळपास सर्वच भाज्या २ ते १० रुपयांनी तर किरकोळ बाजारात भाज्या ५ ते ३० रुपयांनी महागल्या आहेत.

वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवार करोना विषाणूचा संसर्ग केंद्र बनल्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये बाजार समिती आवारात दिवसाला येणाऱ्या गाड्यांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली होती. त्यातच श्रावण महिना असल्यामुळे भाज्यांच्या मागणीत वाढ होऊन दरही वाढले होते. गेल्या काही दिवसांपासून वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये गाड्यांच्या संख्येवर घालण्यात आलेली मर्यादा उठवण्यात आली आहे. त्यामुळे बाजार पूर्ण क्षमतेनुसार सुरू झाला आहे. असे असले तरी गेल्या आठवड्याभरात झालेल्या पावासामुळे पुणे, नाशिक पट्ट्यातील भाजी पिकावर परिणाम झाला असून आवकही काही प्रमाणात घटली आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मुंबई-ठाण्यात येणाऱ्या भाज्यांची आवक २० टक्क्यांनी कमी झाली आहे. आठवड्याभरापूर्वी वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांच्या ५०० ते ६०० गाड्या दाखल होत होत्या. आवक घटल्यामुळे हे प्रमाण ४०० ते ४५० पर्यंत कमी झाले आहे. भाज्यांची आवक घटल्याने

दरांमध्ये वाढ झाली असून घाऊकबाजारात भाज्यांच्या दरात २ ते १० रुपयाने तर किरकोळ बाजारात ५ ते ३० रुपयांनी भाज्यांचे दर वाढले आहेत.

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. आवक घटल्याने दरात वाढ झाली असून पुढील काही दिवसांत मात्र दर नियमित होतील.

– भगवान तुपे, किरकोळ भाजी विक्रेते, ठाणे