आवक घटल्याने दरांत वाढ; किरकोळ बाजारात दुप्पट भावाने विक्री

ठाणे : उन्हाच्या झळा वाढू लागताच भाज्यांचे दरही वाढू लागले असून  घाऊक आणि किरकोळ बाजारात फरसबी, फ्लॉवर, भेंडी, तोंडली अशा भाज्या महागल्या आहेत. मागील पंधरवडय़ापासून दरवाढीचे सत्र सुरू झाले होते. मे महिन्याच्या सुरुवातीला भाज्यांच्या दरात आणखी वाढ होईल, असा दावा विक्रेत्यांकडून केला जात होता. दरम्यान, मुंबई, ठाणे, नवी मुंबईस राज्यातील अन्य भागातून होणाऱ्या भाजीपुरवठय़ात घट झाली असून घाऊक बाजाराच्या तुलनेत किरकोळ बाजारात दुप्पट किमतीने भाज्यांची विक्री सुरू आहे. किरकोळ बाजारात प्रमुख भाज्या मोठय़ा फरकाने विकल्या जात असल्याचे चित्र आहे.

उन्हाळ्याच्या काळात दरवर्षी भाज्यांची आवक कमी होते. परिणामी ग्राहकांना जास्त दर मोजावे लागतात. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून भाज्यांची आवक कमी झाली होती. सध्या फरसबीसारख्या भाजीने किरकोळीत शंभरी पार केली असून, फ्लॉवर, भेंडी, तोंडली या भाज्या जवळपास ६० ते ७० रुपये किलोने विकल्या जात आहेत. मात्र घाऊक बाजारात या भाज्या २० ते ३० रुपये किलोने विकल्या जात आहेत. कल्याण कृषी समिती बाजार समितीच्या भाजीपाला बाजार आवारात कृषीमालाची आवक मंदावली आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. लग्नसराई, उन्हाळा या सर्व कारणांमुळे भाज्यांची मागणी अधिक वाढली आहे. मागणी वाढली असली तरी भाज्यांची आवक कमी झाली असल्याने भाज्या महागल्या असल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले. एरवी कल्याण कृषी बाजार समितीच्या घाऊक बाजार आवारात १८० गाडय़ांची आवक होत असे. सध्या ही संख्या ७०-८० पर्यंत रोडावली आहे, अशी माहिती कल्याण कृषी समितीचे साहाय्यक सचिव बी.एन. देशमुख यांनी दिली.

सध्या घाऊक बाजारात ७० रुपये किलोने मिळणारा मटार हंगाम नसतानाही किरकोळीत १६० रुपये या दराने विकला जात आहे. घाऊक बाजारात तीन ते चार रुपयांनी वाढलेले दर आणि उन्हाळ्यामुळे भाज्यांची आवक मंदावली असल्याचे कारण देत किरकोळीत मात्र ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचा प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे. घाऊक बाजारात १२ रुपये किलोने मिळणारा फ्लॉवर ठाण्याच्या काही किरकोळ बाजारात चक्क ७० रुपये किलोने विकला जात असून ३६ रुपये किलोने मिळणारी फरसबी १२० रुपये किलोने विकली जात आहे. तर ३२ रुपये किलोने मिळणारी भेंडी ८० रुपयांनी विकली जात असल्याची माहिती भाजी विक्रेते दर्शन म्हात्रे यांनी दिली. उन्हाळ्यामुळे  या भाज्या महाग झाल्याचा दावा त्यांनी केला तसेच या भाज्यांचा दर आणखी वाढण्याची दाट शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. हे दर साधारण जूनच्या मध्यापर्यंतच असेच राहण्याचा अंदाजही त्यांनी वर्तविला आहे.

बटाटा महागला

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश येथून आवक होणाऱ्या बटाटय़ाची आवक मंदावली आहे. मुळातच बटाटय़ाचे उत्पन्न घटले असून घाऊक बाजारात ८ ते ९ रुपये किलोने विकला जाणारा बटाटा किरकोळ बाजारात १८-२० रुपये किलोने विकला जात असल्याची माहिती कल्याण कृषी समितीतर्फे देण्यात आली.

भाज्या  सध्याचे मागील

            भाव          आठवडय़ाचे भाव

कोबी          ५०              ३०

भेंडी           ६०              ४०

फ्लॉवर         ७०           ४०

कोथिंबीर       ७०           ३५

फरसबी        १२०           ७५

मटार         १६०            १००