04 December 2020

News Flash

भाजीदरांत घसरण

रतीच्या पावसाच्या तडाख्यामुळे भाजीपिकाचे नुकसान होऊन वाढलेले भाज्यांचे दर आता घसरणीला लागले आहेत.

गेल्या काही दिवसांत मुंबई, ठाणे पट्टय़ात भाज्यांची आवक वाढली असल्याने सर्वच भाज्या स्वस्त झाल्या आहेत.

आवक वाढल्याने दरांमध्ये घसरण; कांदा, बटाटा, लसणाचे दर मात्र चढेच

लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : परतीच्या पावसाच्या तडाख्यामुळे भाजीपिकाचे नुकसान होऊन वाढलेले भाज्यांचे दर आता घसरणीला लागले आहेत. गेल्या काही दिवसांत मुंबई, ठाणे पट्टय़ात भाज्यांची आवक वाढली असल्याने सर्वच भाज्या स्वस्त झाल्या आहेत. मात्र, कांदा, बटाटा, लसूण यांची आवक अद्याप वाढली नसल्याने त्यांचे दर चढेच आहेत.

यंदा ऑक्टोबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पुणे, नाशिक जिल्ह्य़ातील भाजीच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये येणाऱ्या भाज्यांची आवक घटली होती. आवक घटल्याने ऐन नवरात्रीत भाज्यांच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झाली होती. मात्र, नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे नाशिक आणि पुणे जिल्ह्य़ात थंडीचे वातावरण जाणवू लागले आहे. हे वातावरण भाजी पिकांसाठी पोषक असल्यामुळे सध्या मुंबई, ठाणे आणि उपनगरामध्ये भाज्यांची आवक वाढू लागली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर १० ते ५० रुपयांपर्यंत कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. असे असले तरी एरवीपेक्षा भाज्यांचे दर चढेच असल्याचे दिसून येत आहेत. मात्र, येत्या काही दिवसात आवक आणखी वाढणार असल्याने भाज्यांचे दर आणखी कमी होण्याची शक्यता विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

कांदा, बटाटा आणि लसणाची आवक अद्यापही पुरेशा प्रमाणात होत नसल्यामुळे त्यांचे दर चढेच असल्याचे चित्र आहे. कांदा, बटाटा आणि लसणाचा नवा माल येण्यास विलंब होत असल्यामुळे हे दर वाढले आहेत. येत्या महिनाभरात नवीन माल येण्याची शक्यता असून त्यानंतर त्यांचे दर घसरण्याची शक्यता आहे, अशी माहिती कांदा-बटाटा विक्रेते अमोल गायकवाड यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

भाज्यांची आवक पुरेशा प्रमाणात होऊ लागल्यामुळे दरांमध्ये घसरण झाली आहे. येत्या काही दिवसात आवक वाढणार असून दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
– भगवान तुपे, भाजी विक्रेते, ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 1:03 am

Web Title: vegetables rates came down dd70
Next Stories
1 आलिशान वाहनांच्या मालकांवर दंडुका
2 जलतरण संस्थांच्या मनमानीला चाप
3 आरक्षित भूखंडांवर बेकायदा इमारती
Just Now!
X