ठाणे येथील मासुंदा तलाव परिसरातील डॉ. मूस मार्गावर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार असून या सभेसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन संभाव्य अपघात टाळण्यासाठी येथील गडकरी रंगायतन नाटय़गृहाच्या आवारात वाहनांना प्रवेश बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. दुपारी दोन वाजल्यापासूनच या ठिकाणी वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार असल्यामुळे त्याचा फटका नाटय़रसिकांना बसणार आहे.

एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या दुर्घटनेनंतर सर्वच रेल्वे स्थानक परिसरातील फेरिवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शनिवारी ठाण्यात जाहीर सभा होणार आहे. ठाणे स्थानक परिसरात ही सभा घेण्यासाठी मनसेचे स्थानिक पदाधिकारी आग्रही होते. मात्र, रेल्वे स्थानक परिसरातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सभेमुळे त्रास सहन करावा लागू शकतो, तसेच या सभेसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी या ठिकाणी सभा घेण्यास परवानगी नाकारली होती. अखेर मासुंदा तलाव परिसरातील डॉ. मूस मार्गावर सभा घेण्यास पोलिसांनी परवानगी दिली असून या ठिकाणी सभेचे व्यासपीठ उभारण्याचे कामही सुरू झाले आहे. या सभेच्या पाश्र्वभूमीवर या भागातील मार्गावर वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ आता या सभेच्या व्यासपीठापासून काही अंतरावर असलेल्या गडकरी रंगायतनच्या आवारातही वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असून यासंदर्भात गडकरी रंगायतन व्यवस्थापनाने प्रवेशद्वाराजवळ तसा फलकही लावला आहे. ‘पती गेले ग काठेवाडी’ या नाटकाचा शनिवारी दुपारी साडेचार वाजता तर ‘अंदाज आपला आपला’ या नाटकाचा रात्री साडेआठ वाजता प्रयोग होणार आहे. व्यवस्थापनाच्या निर्णयामुळे या दोन्ही नाटकांच्या प्रेक्षकांना गडकरी रंगायतनच्या आवारात वाहने नेणे शक्य होणार नाही.  त्यामुळे या प्रेक्षकांना त्रास सहन करावा लागणार आहे. दरम्यान, सभेसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन संभाव्य अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सभेच्या पाश्र्वभूमीवर गडकरी रंगायतनच्या दिशेने येणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद केले जाणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची वाहने तशीही गडकरीच्या आवारात येऊ शकणार नाहीत, असे व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले.