19 January 2020

News Flash

नायजेरियन नागरिकांकडून वाहनांची मोडतोड

नालासोपारा पूर्व प्रगतीनगर येथे मोठय़ा प्रमाणात नायजेरियन नागरिकांची वस्ती आहे.

तरुणाच्या संशयास्पद मृत्यूनंतर नालासोपाऱ्यात संताप; पोलिसांकडून गुन्हा दाखल

नालासोपारा परिसरात एका नायजेरियन तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरातील नायजेरियन नागरिकांनी परिसरातील रस्त्यावर उभ्या वाहनांची मोडतोड करत येथील भारतीय नागरिकांना मारहाण केली. या घटनेत काही नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद तुळिंज पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

नालासोपारा पूर्व प्रगतीनगर येथे मोठय़ा प्रमाणात नायजेरियन नागरिकांची वस्ती आहे. या वस्तीत मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास एक नायजेरियन नागरिक गणेश शाळेजवळ मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेनंतर संतप्त नायजेरियन नागरिकांनी परिसरात उच्छाद मांडला. या नागरिकांनी लाठय़ा-काठय़ासह परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची मोडतोड केली. त्यात काही स्थानिक नागरिक त्यांना रोखण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. यात १० ते १५ स्थानिक नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत पावलेल्या नायजेरियन नागरिकाची खरी ओळख पटली नसून केवळ त्याचे नाव जोसेफ असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली. तुळिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण समजले नसल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या व्यक्तीचे पारपत्र, भारतातील व्हिसा अथवा त्याची खरी ओळख करून देणारी कोणतीही कागदपत्रे मिळाली नाही. तसेच ज्या नागरिकांनी रात्री वाहनांची मोडतोड केली त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बेकायदा वस्ती

नालासोपाऱ्यातील प्रगतीनगर परिसरात मोठय़ा प्रमाणत नायजेरियन नागरिक राहत आहेत. यातील बहुतांश नागरिक बेकायदा राहत आहेत, त्यांनी या ठिकाणी स्वत:चे नगर वसवले आहे. या ठिकाणी त्यांची दुकाने, हॉटेल, बार आहेत. रात्रीच्या वेळी या ठिकाणी मोठय़ा पाटर्य़ा केल्या जातात. हे नागरिक अमली पदार्थविक्रीचा व्यवसाय करत असल्याचे येथील स्थानिकांनी सांगितले. यामुळे स्थानिकांना या नायजेरियन नागरिकांचा धोका निर्माण झाला आहे.

First Published on October 17, 2019 2:08 am

Web Title: vehicle breakdown nigerian citizens akp 94
Next Stories
1 प्रचाराच्या धुरळ्यात डोंबिवलीतील ‘धूळ’धाण ऐरणीवर
2 मुंब्रा बावळण खड्डय़ात
3 भाजपच्या फलकांना शिवसेनेच्या नगरसेवकांची कात्री
Just Now!
X