विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी खासगी कंपन्यांचा पुढाकार

विजेवर धावणाऱ्या वाहनांचा वापर वाढावा, यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील मॉल आणि बँकांनाही त्यांच्या जागेमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्याची सक्ती करण्याचा विचार सुरू केला आहे. त्यासाठी महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीत सुधारणा करण्यात येणार आहेत. लवकरच यासंबंधीचा प्रस्ताव आखला जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली.

विजेवर धावून प्रदूषण टाळणाऱ्या वाहनांचा वापर वाढावा, यासाठी शहराच्या विविध भागांत वाहन चार्जिंग स्थानके उभारण्याचा निर्णय पालिकेने यापूर्वीच घेतला आहे. शहरातील चार ते सहा एकरांच्या भूखंडावर दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी चार्जिंग स्थानकासह हॉटेल बांधण्याचाही महापालिकेचा विचार आहे. त्यासाठी पालिकेने शहरात जागेचा शोध सुरू केला आहे. चार्जिंग स्थानकांची सुविधा पुरविण्यासाठी गुरुवारी महापालिकेत महत्त्वाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, महिंद्रूा कंपनी आणि कायनेटिक ग्रीन कंपनी यांच्यात हा करार झाला.

केंद्र शासनाच्या धोरणानुसार ठाणे शहरात विजेवर धावणाऱ्या वाहनांचा वापर वाढावा यासाठी महापालिकेच्या खर्चातून शहरात १०० स्थानक उभारणार येणार होती. तसेच पुढील १५ वर्षे स्थानकांची निगा व देखभाल पालिकेमार्फत राखण्यात येणार होती. तरीही विजेवरील वाहनांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी ही स्थानके उभारण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यानुसार आता महापालिकेऐवजी महिंद्रा कंपनी आणि कायनेटिक ग्रीन कंपनीच्या माध्यमातून शहरात चार्जिंग स्थानके उभारली जाणार आहेत. या स्थानकांसाठी महापालिका केवळ जागा उपलब्ध करून देणार असून अन्य कंपन्यांची वाहनेही चार्जिंगसाठी येऊ शकतात, अशी माहिती आयुक्त जयस्वाल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

सुरुवातीला सवलत

ग्राहकांना चार्जिंगच्या दरात पहिल्यावर्षी ७५ टक्के, दुसऱ्या वर्षी ५० टक्के आणि तिसऱ्या वर्षी २५ टक्के सवलत दिली जाणार आहे. या सवलतीची रक्कम महापालिका भरणार आहे. या वाहनांचा वापर वाढविण्याच्या उद्देशातून ही सवलत देण्यात येणार आहे. याशिवाय, वाहन चार्ज होईपर्यंत ग्राहकाला थांबायचे नसेल तर त्याला बॅटरी अदलाबदलीचाही पर्याय उपलब्ध असणार आहे, असेही आयुक्त जयस्वाल यांनी सांगितले.

नव्या तरतुदींचा विचार

देशातील नामांकित वाहन उत्पादन कंपन्यांकडून शहरात चार्जिंग स्थानके उभारण्यासाठी पुढाकार घेतला जात असला तरी सद्यस्थितीत अस्तित्वात असलेले तसेच नव्याने उभे राहणारे मॉल, बॅकांच्या आवारातही अशी स्थानके असावीत असा महापालिकेचा प्रयत्न आहे. याशिवाय, महापालिकेच्या माध्यमातून शहरात दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहने चार्ज करण्याची आणि तिथेच खाद्य पदार्थ विक्रीची सोयही करण्यात येणार आहे. घोडबंदर किंवा अन्य भागांत हे स्थानक उभारण्यात येणार असून त्यासाठी जागेचा शोध सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात शहरामध्ये अशी स्थानके उभारण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात शहरांच्या प्रवेशद्वारांवर ही स्थानके उभारण्याचा विचार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.