किशोर कोकणे

ठाणे, भिवंडी तसेच कल्याण शहरातील वाहने सुस्थितीत आहेत की नाहीत याची तपासणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने नांदिवली भागात वर्षभरापूर्वी मार्गिका तयार केली होती. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या मार्गिकेची दुर्दशा झाली असून तपासणीसाठी आलेली वाहने बेशिस्तपणे उभी केली जात आहेत. अवघ्या वर्षभरातच ही मार्गिकेची दुरवस्था झाल्याने त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्याचबरोबर या कामासाठी करण्यात आलेला खर्च पाण्यात गेल्याचे चित्र आहे.

राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागाकडे वाहन योग्यता चाचणी तपासणी मार्गिका नसल्याने धोकादायक वाहने रस्त्यावर धावत असल्याचा आरोप पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत कर्वे यांनी केला होता. याबाबत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले होते. तसेच प्रादेशिक परिवहन विभागाला वाहन योग्यता चाचणी मार्गिका तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कल्याण येथील नांदिवली भागात लाखो रुपये खर्च करून ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने २५० मीटरच्या दोन मार्गिका तयार केल्या होत्या. या मार्गिकेवर ठाणे, कल्याण, भिवंडी शहरातील तीनशे वाहनांची दररोज चाचणी घेतली जाते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या मार्गिकेची दुर्दशा झाली आहे. या मार्गिकेच्या शेजारी असलेल्या वाहनतळावर चिखल झाला असून त्यात अवजड वाहनांची चाके रुतत आहेत. त्यामुळे चाचणीच्या मार्गिकेवरच अनेक चालक वाहने उभी करत आहेत. २५० मीटरपैकी १२५ मीटरची मार्गिकेवर वाहने उभी राहत असून यामुळे चाचणीसाठी अर्धीच मार्गिका उपलब्ध होत आहे. त्यामुळे वाहनांची तपासणी योग्यप्रकारे करणे शक्य होत नसतानाही त्याठिकाणी प्रादेशिक परिवहन विभागाकडून तपासणी सुरूच असल्याचे दिसून येते.

जेसीबीचा खर्च वाढला..

अनेक अवजड वाहने मैदानात उभी केली जातात. मात्र पावसामुळे मैदानात चिखल झाला असून त्यात ट्रकची चाके रुतत आहेत. त्यामुळे चिखलात अडकलेले ट्रक बाहेर काढण्यासाठी वाहनमालकांना जेसीबीची मदत घ्यावी लागत असून त्यासाठी त्यांना ८०० रुपये खर्चून जेसीबी भाडय़ाने आणावा लागत आहे, अशी माहिती एका चालकाने दिली.

वाहन चाचणी महत्त्वाची

योग्यता तपासणी चाचणी केल्यानंतर वाहन रस्त्यावर चालवण्यासाठी योग्य आहे की नाही हे समजते. यामुळे रस्त्यावरील अपघातात रोखणे शक्य होते. तसेच अवजड वाहनांची दर दोन वर्षांनी, तर कारची दर पंधरा वर्षांनी चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

गेल्या चार दिवसांपासून पाऊस सुरू असल्यामुळे चाचणी मार्गिकेजवळ चिखल झाला असून हे वाहनतळ तातडीने दुरुस्त करण्यात येणार आहे. त्यामुळे मार्गिकेवर उभी राहणारी वाहने पुन्हा वाहनतळात उभी करणे शक्य होईल.

– संजय ससाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण