ऋषीकेश मुळे

गतवर्षीच्या तुलनेत यंदा दोन हजारांची घट; वाहतूक कोंडीच्या प्रकारांमुळे उत्साह कमी झाल्याचा आरटीओचा दावा

साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी अनेकजण वाहन खरेदी करण्यास प्राधान्य देतात. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मात्र पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी केल्या जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत तब्बल दोन हजारांची घट झाली आहे. ठाणे आणि आसपासच्या शहरांत वाढू लागलेल्या वाहतूक कोंडीच्या प्रकारामुळे खरेदीदार वाहन खरेदीबाबत काहीसे उदासीन असल्याचा दावा प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) अधिकाऱ्यांनी तसेच वाहन कंपन्यांच्या वितरकांनी केला आहे.

ठाणे आणि कल्याण भागात गेल्या वर्षी एकूण ६ हजार १८८ नव्या वाहनांची नोंद झाली होती. यंदा मात्र ४ हजार १५९ नवी वाहने खरेदी झाल्याचे दिसून येत असून शहरात होणारी वाहतूक कोंडी हेच या वाहन खरेदीच्या घटत्या प्रमाणाचे कारण असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली भागात सुरू असणारी मेट्रो, उड्डाणपूल आणि रस्त्यांची कामे यामुळे शहरातील मुख्य मार्गासोबत अंतर्गत मार्गही वाहतूकीच्या विळख्यात अडकून पडत आहेत. जवळपास सर्वच रस्त्यांवर दररोज वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत असल्याने वाहनचालक त्रासून गेले आहेत. वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी होत नाही, तोपर्यंत वाहन खरेदी करूनही फायदा नाही, या विचाराने खासगी उपयोगासाठी वाहन खरेदी करण्याचे प्रमाण कमी झाल्याची माहिती परिवहनमधील सूत्रांनी दिली.

गुढीपाडव्यानिमित्त आठवडाभर अगोदरपासून ग्राहकांकडून वाहन खरेदीची प्रक्रिया सुरू होते. गेल्या वर्षी १८ मार्च रोजी गुढीपाडवा होता. त्या वेळी ११ मार्च ते १७ मार्च या कालावधीत ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे नव्या ३ हजार ६४४ वाहनांची नोंद झाली होती. यामध्ये २ हजार ५५७ दुचाकी तर ४७३ कारची ग्राहकांनी खरेदी केली. कल्याण प्रादेशिक परिवहन विभागाकडे २ हजार ५४४ नव्या वाहनांची नोंद झाली. १ हजार ८३८ दुचाकींचा तर ३०३ कारचा समावेश आहे. १ एप्रिल ते ७ एप्रिल या कालावधीत ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे २ हजार ३७० नव्या वाहनांची नोंद झाली. यामध्ये १ हजार ६२४ दुचाकी तर ४३५ कारचा समावेश आहे.

शहरात वाहतूक कोंडी वाढत चाललेली आहे. या कोंडीत वाहन चालवणे डोकेदुखी ठरत असल्याने नव्याने वाहन खरेदी करण्याकडे ग्राहक हात आखडता घेत आहेत. प्रवासी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिक वापर करत आहेत. वाहन विक्रेत्यांकडूनही अशा स्वरूपाचे निरीक्षण नोंदविले जात आहे.

– नंदकिशोर नाईक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी