|| नीलेश पानमंद

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील एसटीच्या जागेचा वापर; कळवा परिसरातही वाहनतळाची निर्मिती

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात अपुऱ्या वाहनतळांमुळे निर्माण होणारी पार्किंगची समस्या आणि रस्त्यालगत अनधिकृतपणे वाहने उभी केल्याने होणारी वाहतूक कोंडी यातून मार्ग काढण्यासाठी ठाणे महापालिकेने स्थानक परिसरात नव्या वाहनतळांची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानकालगत असलेली राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) जागा आणि मुख्य बाजारपेठेतील महापालिकेचे जुने कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालये आणि कन्याशाळेच्या जागेचा एकत्रित विकास करून वाहनतळ उभे केले जाणार आहे. या माध्यमातून ठाणे स्थानक परिसरात तब्बल दीड हजार वाहने सामावू शकतील, इतके मोठे वाहनतळ सुरू होणार आहे.

ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातून दररोज सहा ते सात लाख प्रवासी कामानिमित्त प्रवास करतात. बस आणि रिक्षांच्या रांगा टाळण्यासाठी अनेक जण घरापासून स्थानकापर्यंत स्वत:च्या वाहनाने प्रवास करतात. स्थानकात पुरेशा वाहनतळाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक जण रस्त्यावर बेकायदा वाहने उभी करतात. आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर बेकायदा वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होते. वाहतूक पोलिसांकडून अशा वाहनांवर कारवाई करण्यात येते. यावरून अनेकदा संघर्षही निर्माण होतो. या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आता स्थानक परिसरात नव्या वाहनतळांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी स्थानकाजवळील राज्य परिवहन महामंडळाची जागा आणि मुख्य बाजारपेठेतील महापालिकेच्या जुन्या कार्यालयासह शासकीय कार्यालयांच्या जागेची निवड केली आहे.

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एक बैठक नुकतीच पार पडली होती. त्यामध्ये ठाणे आणि कळवा भागांतील एसटी महामंडळाच्या जागेवर वाहनतळ आणि अन्य सार्वजनिक सुविधा विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे दोन्ही प्रस्ताव मंजुरीसाठी परिवहन विभागाला पाठवण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार या दोन्ही जागांच्या आरक्षण फेरबदलाचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला असून हे दोन्ही प्रस्ताव येत्या सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केले आहेत. याशिवाय, मुख्य बाजारपेठेतील महापालिकेचे जुने कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा परिषदेची कार्यालये, कन्याशाळेच्या जागेचा एकत्रित विकास करून त्या ठिकाणी वाहनतळाची सुविधा निर्माण करण्याचाही प्रस्ताव प्रशासनने मंजुरीसाठी सादर केला आहे.

वाहनतळांचा प्रस्ताव असा..

  • ठाणे स्थानकाजवळ एसटी महामंडळाची १७५०० चौरस मीटर इतकी जागा असून त्या ठिकाणी आगारासह वाहनतळ आणि वाणिज्य वापराचे आरक्षण टाकण्यात येणार आहे.
  • मुख्य बाजारपेठेतील महापालिकेचे जुने कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा परिषदेची विविध कार्यालये आणि कन्याशाळेची एकत्रित जागा १८ हजार चौरस मीटर इतके असून त्या ठिकाणी शासकीय कार्यालयांसह वाहनतळाची उभारणी करण्यात येणार आहे.
  • या ठिकाणी भुयारी वाहनतळ उभारण्याचा प्रशासनाचा विचार असून प्रकल्प अहवाल तयार करताना त्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

कळव्यातही वाहनतळ..

कळव्यात एसटी महामंडळाची ४ हजार चौरस मीटरची जागा असून या ठिकाणी आगारासह वाहनतळ आणि वाणिज्य वापराचे आरक्षण टाकण्यात येणार आहे. यामुळे ठाणे स्थानकापाठोपाठ भविष्यात कळव्यातही वाहनतळाची सुविधा उपलब्ध होणार आहे.