किन्नरी जाधव, ऋषिकेश मुळे

वर्षभरात सव्वा लाख नव्या वाहनांची नोंदणी; वाहतूककोंडीत भर पडण्याची चिन्हे

अपुरे, निकृष्ट रस्ते आणि वाढती वाहनसंख्या यामुळे आधीच होत असलेली शहराची कोंडी आता आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षभरात रस्त्यांच्या परिस्थितीत काहीही सुधारणा झाली नसली तरी याच काळात ठाणे शहरात सव्वा लाख नव्या वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे रस्त्यांवरील वाहनभार वाढणार आहे.

ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार १८ हजार ७० चारचाकी आणि ८० हजार ६८१ दुचाकींची खरेदी झाली आहे. शहराअंतर्गत सार्वजनिक वाहतूक सेवेची पुरेशी सुविधा नसल्याने बहुतेक नागरिक आता खासगी वाहन खरेदीकडे वळत आहेत. त्यामुळे भविष्यात शहरातील वाहतूक व्यवस्था अधिकच बिकट होण्याची चिन्हे आहेत.

गेल्या काही वर्षांत ठाणे शहराची लोकसंख्या झपाटय़ाने वाढली आहे. बडी गृहसंकुले वसू लागल्यावर नवे ठाणे अशी ओळख मिरवणाऱ्या घोडबंदर आणि परिसरात लोकवस्ती मोठय़ा प्रमाणात वाढली. मात्र दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रवाशांच्या तुलनेत पुरेशी सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध नाही. मुख्य शहरापासून दूर असलेल्या या परिसरातून स्थानक परिसराकडे येण्यासाठी परिवहन बस, रिक्षा असल्या तरी अनियमित वेळांमुळे प्रवास त्रासदायक ठरू लागला आहे. ठिकठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे शहराच्या अंतर्गत आणि बाह्य़रस्त्यांवर वाहतुकीचा ताण पडून वाहतुकीचे नियोजन फसू लागले आहे. या पेचावर पर्याय म्हणून बहुतेक नागरिकांनी खासगी वाहन खरेदीचा पर्याय अवलंबला आहे.

या खरेदीमुळे सातत्याने नवीन वाहनांचा भार वाढत असून रस्त्यावर वाहनांची संख्या कमालीची वाढू लागली आहे. वर्षभरात ३० हजार ७३ नवीन मालवाहू वाहने तसेच विनावाहतूक असलेल्या ९९ हजार ४६ नवीन वाहनांची खरेदी करण्यात आली आहे.

रिक्षांमध्येही वाढ

शहरांतर्गत वाहतुकीसाठी रिक्षा सोयीस्कर ठरतात. ठाणे रेल्वे स्थानकातून अंतर्गत भागात जाणाऱ्या रिक्षांची संख्या मोठी आहे. रिक्षांतही वाढ होत आहे. चार महिन्यांत शहरात पाच हजार ६६० नवीन रिक्षा दाखल झाल्या आहेत. तसेच वर्षभरात काळी-पिवळी रिक्षा आणि अबोली रिक्षा यांची एकत्रित संख्या ५४ हजार ८८८ एवढी झाली आहे.

ठाणे विस्तारत आहे. नागरिक खासगी वाहनांचा अधिक वापर करू लागले आहेत. नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावत असून हप्त्यावर वाहने घेणे शक्य झाले आहे. रस्ते सुसज्ज होऊ लागले आहेत. त्यामुळे खासगी वाहनांची खरेदी वाढत आहे.

-अमित काळे, पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतूक विभाग