कल्याण, डोंबिवली शहरांमधील रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते, रेल्वे स्थानक भागातील वाहनतळ दुचाकी वाहनांनी गच्च भरलेली असतात. कल्याणमध्ये पालिकेचे रेल्वे स्थानकाजवळ अधिकृत दिवंगत दिलीप कपोते वाहनतळ आहे. हे दुमजली वाहनतळ भुयारापासून ते इमारतीच्या गच्चीपर्यंत दुचाकी वाहनांनी तुडुंब भरलेले असते. डोंबिवलीत पालिकेचे स्वत:चे वाहनतळ नाही. रेल्वे स्थानकाजवळील पी. पी. चेंबर्स मॉलमध्ये वाहनतळ आहे. ते ठेकेदार स्वत: चालवतो. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ तीन ते चार वाहनतळासाठी आरक्षित भूखंड आहेत. त्यावर काही संस्थांची मालकी आहे. दोन वाहनतळांची जमीन रेल्वेच्या विकासकामांसाठी वापरण्यात आली आहे.
बाजीप्रभू चौकात सुसज्ज वाहनतळ उभे राहत आहे. ते विकासकाकडून पालिका किती ताकदीने स्वत:च्या ताब्यात घेते यावर त्या वाहनतळाचे भवितव्य अवलंबून आहे. डोंबिवली रेल्वे स्थानक भागात पुरेसे वाहनतळ नसल्याने शहराच्या पश्चिम भागातील महात्मा फुले रस्ता, सुभाष रस्ता, विष्णुनगर पोलीस ठाण्यामागील गल्ल्या, पूर्व भागात रामनगर, मानपाडा रस्ता, राजाजी रस्ता, तेथील अंतर्गत गल्ल्यांमध्ये वाहतूक विभागाच्या आदेशानुसार सम, विषम तारखेला रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभे करून ठेवण्यात येतात.
शहरातील अनेक नागरिकांकडे वाहने आहेत. रोज आपल्या वाहनाने रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाऊन गाडी वाहनतळावर ठेवायची आणि लोकलने नोकरीच्या ठिकाणी प्रवास करायचा, अशी स्वप्ने डोंबिवलीकर पाहतो. पण वाहनतळ नसल्याने त्याला गाडी आपल्या इमारतीच्या वाहनतळावर धूळ खात उभी करून ठेवावी लागते. डोंबिवलीत पूर्व-पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेची दोन वाहनतळे आहेत. यामधील राजाजी रस्ता भागातील वाहनतळ रेल्वेने ठेकेदाराकडून काढून घेतले आहे. पश्चिमेतील द्वारका हॉटेलसमोर एकमेव रेल्वेचे वाहनतळ आहे. ते गजबजून गेलेले असते. या शहरांच्या रेल्वे स्थानक भागात दोन्ही बाजूला चारचाकी वाहने वाहनतळावर उभी करण्यासाठी एकही जागा नाही.
कल्याण रेल्वे स्थानक भागात बोरगावकर वाडीत हजारो चौरस मीटरचे भुयारी वाहनतळ आहे. या वाहनतळावर रिक्षा, अन्य वाहनांना उभी करण्याची सुविधा पालिकेने उपलब्ध करून दिली तर कल्याण रेल्वे स्थानक परिसर वाहतूक कोंडीमुक्त होऊ शकतो. काही वर्षांपूर्वी हा वाहनतळ सुरू करण्याच्या हालचाली सुरू होत्या. पालिकेच्या अखत्यारितील एवढी भव्य वाहनतळाची जागा मागील दहा वर्षांपासून सडत आहे.
आठ वर्षांपूर्वी पालिकेने कल्याण शहराबाहेर दुर्गाडी किल्ल्याच्या बाजूला पार्किंग प्लाझा उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. शहरात नियमित मालवाहू वाहने येतात. ती या वाहनतळावर थांबतील. तेथून लहान वाहनांमध्ये माल उतरवून ती शहरातील नियोजित व्यापाऱ्यांच्या गोदामांमध्ये जातील. तसेच, शहरामध्ये खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांना वाहन उभे करण्यासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध होणार आहे.

खासगी वाहनाने कल्याण परिसरात आले तर ती ठेवायची कुठे, असा प्रश्न वाहन मालकाला पडतो. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ पालिकेचे एकच वाहनतळ आहे. तेथे शेकडो वाहने दररोज असतात. त्यामुळे तेथे वाहन ठेवण्यास जागा नसते. रस्ते, कोपऱ्यांमध्ये वाहने ठेवण्यास जागा नाही. पालिकेने, रेल्वेने रेल्वे स्थानक भागात प्रशस्त वाहनतळे उपलब्ध करून दिली तर अनेक खासगी वाहन मालक, चालक आपली वाहने रेल्वे स्थानक भागात घेऊन येतील. – सिद्धार्थ गायकवाड, कल्याण (मोहने)

रेल्वे स्थानक भागात तर वाहन घेऊन येणे म्हणजे मोठी शिक्षा असते. २७ गाव, शीळ फाटा भागातून नागरिक दररोज डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे येतात. ही वाहने ठेवण्यासाठी चालकांना कस्तुरी प्लाझाजवळील टाटा लाइन, वाहतूक विभागाने जाहीर केलेले रस्ते, खासगी, रेल्वेची वाहनतळे हा एकमेव आधार आहे. पालिकेने रेल्वे स्थानक भागातील वाहनतळाची आरक्षणे विकसित केली तर, वाहने उभी करण्याचा मोठा प्रश्न सुटणार आहे.
– सुनील शहा, डोंबिवली