26 September 2020

News Flash

मुबलक मासळीला माफक दर!

उपनगरी रेल्वेगाडय़ा बंद असल्याने मुंबई बाजारातील विक्रेत्यांची वसईतच मासेविक्री

उपनगरी रेल्वेगाडय़ा बंद असल्याने मुंबई बाजारातील विक्रेत्यांची वसईतच मासेविक्री

कल्पेश भोईर, लोकसत्ता

वसई : यंदाच्या हंगामातील मासेमारीला सुरुवात  झाली आहे. मात्र, उपनगरीय रेल्वेगाडय़ा (लोकल)  बंद असल्याने सध्या वसईत मुबलक मासळी उपलब्ध होऊ लागली आहे. त्यामुळे ग्राहक स्वस्त दरात माशांचा आस्वाद घेत आहेत. कोळी महिलांना उपनगरी रेल्वेगाडय़ा बंद असल्याने मासेविक्रीसाठी मुंबई तसेच उपनगरात जाणे अशक्य होत आहे. त्यामुळे बहुतेक विक्रेत्यांनी कमी दरात मासळीचा बाजार मांडला आहे. परंतु ही अनेक कोळी महिलांना तोटा सहन करून मासळी विकावी लागत आहे.

वसई तालुक्यातील अर्नाळा, पाचूबंदर आणि नायगाव तसेच इतर भागांतील मच्छीमार मुंबईतील बाजारात विक्रीसाठी येतात. यात कोळी महिला पापलेट, वाव, हलवे, बोंबील, करंदी, सुरमई आणि गोली यासह विविध प्रकारच्या मासळीच्या टोपल्या घेऊन विक्रीसाठी कुलाबा, दहिसर, बोरिवली, वांद्रे,  माहीम, अंधेरी, मालाड आणि दादर या ठिकाणी जातात. मात्र करोनाकाळात उपनगरी रेल्वेसेवा बंद ठेवण्यात आली. याशिवाय अनेक ठिकाणचे मासळीबाजार बंद झाले.  टाळेबंदीतील काही नियम शिथिल करण्यात येऊ लागल्याने मासळी बाजार खुले झाले आहेत.

तरीही मासळी बाजारात पोहोचण्यास अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. उपनगरी रेल्वेगाडय़ांमधून सर्वसामान्यांना अद्याप  मुभा देण्यात आलेली नाही. त्यामुळे हाताशी आलेली मासळी वाया जाऊ न देता ती वसई आणि आजूबाजूच्या परिसरात विकण्यास कोळी महिलांनी सुरुवात केली आहे. मुंबईत चांगल्या प्रतीच्या मासळीला चांगला भाव मिळतो. परंतु, ती सध्या स्थानिक बाजारात कमी भावाने विकावी लागत असल्याची खंत एका महिला विक्रेतीने व्यक्त केली. सामान्य परिस्थितीत ३० ते ४० टक्के दर कमी मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

मुंबईतील मासळी बाजार खुला झाला असल्याने  खासगी वाहनांच्या साह्य़ाने काही महिला जात आहेत. यासाठी दीड ते दोन हजार रुपये इतके भाडे मोजावे लागत आहे.  तरीही इतके भाडे मोजून पुरेसा व्यवसाय होत नसल्याचे वांद्रे येथील मासळी बाजारातील विक्रेत्या कल्पना कोळी यांनी सांगितले.

‘आर्थिक तोटय़ात वाढ’

करोनामुळे मागील पाच महिने घरात बसून होतो. आता दहा दिवस झाले मासळी विक्रीसाठी दहिसर मासळीबाजारात जात आहे. मात्र, रिक्षाला ९०० भाडे द्यावे लागत आहे. मासळीलाही मागणी तितकी नाही. त्यामुळे आर्थिक तोटा वाढल्याचे मीरुबाई गंगीकर म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 1:42 am

Web Title: vendors in mumbai market sell fish at vasai due to local train close zws 70
Next Stories
1 चाचण्या जोरात, मात्र नियमांचा फज्जा
2 करोनाकाळात पौगंडावस्थेतील मुलींचे सर्वेक्षण
3 रुग्ण करोनामुक्त होण्याच्या प्रमाणात घसरण
Just Now!
X