‘पंतप्रधान काळजी निधी’तील ३० यंत्रे: आयुक्तांचा वचक नसल्याने आरोग्य विभागात सावळागोंधळ

डोंबिवली : डोंबिवली शहरात कृत्रिम श्वसन यंत्राची सुविधा असलेल्या खाटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आहेत. असे असताना ‘पंतप्रधान काळजी निधी’तून कल्याण-डोंबिवली पालिकेला मिळालेली ३० कृत्रिम श्वसन यंत्रे मागील काही दिवसांपासून डोंबिवली जिमखाना येथील प्रस्तावित समर्पित करोना रुग्णालयात पडून असल्याची माहिती पुढे आली आहे.

या यंत्रांचे पुढे काय करायचे याविषयी वैद्यकीय आरोग्य विभागात गोंधळ असल्याचे दिसून येत आहे. डोंबिवली जिमखाना येथे सुमारे २२५ प्राणवायूयुक्त खाटांचे करोना रुग्णालय उभारणीचे काम सुरू आहे. अनेक दिवस हे काम मंदगतीने सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचे नेते या ठिकाणच्या कामाची पाहणी करण्यासाठी नित्यनेमाने येतात. असे असतानाही या कामाला वेग नाही अशा तक्रारी आहेत. आतापर्यंत लाखो रुपये पालिकेने या कामासाठी खर्च केले आहेत. या ठिकाणी ज्या खासगी संस्थेची अथवा ठेकेदाराची यंत्रणा काम करेल त्यांनी येथे कृत्रिम श्वसन यंत्र तसेच इतर सुविधा बसवून घेण्याचे नियोजन करावे, असे सध्या ठरविण्यात आले आहे. महापालिकेच्या शास्त्रीनगर, रुक्मिणीबाई आणि पालिका नियंत्रित रुग्णालयात कृत्रिम श्वसन यंत्रे नाहीत. ही यंत्रणा उभी नसल्याने रुग्णांचे हाल सुरू आहेत. शास्त्रीनगर रुग्णालयात दोन यंत्रे उपलब्ध होती. मात्र ही यंत्रणाही पुढे आर. आर. रुग्णालयात नेण्यात आली होती. ओरडा झाल्यानंतर ती तेथून पुन्हा शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आली. पंतप्रधान काळजी निधीतून (पीएम केअर फंड) महापालिकेकडे ३० कृत्रिम श्वसन यंत्रे उपलब्ध झाली आहेत. त्यामधील किमान १० यंत्रे महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात, पाच कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात आणि उरलेली जिमखान्यातील रुग्णालयात बसविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी मनसेचे राजेश कदम यांनी केली आहे. जेथे सामान्य रुग्ण उपचार घेतात तेथे किरकोळ सुविधा आणि जेथे मध्यमवर्गीय, अधिकारी दर्जाचे उपचार घेणार आहेत तेथे सुसज्ज वैद्यकीय सुविधा असा भेद प्रशासनाकडून केला जात असल्याची टीका कदम यांनी केली आहे.

कल्याणमधील होली क्रॉस रुग्णालयात पालिकेने लाखो रुपये खर्च करून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तेथेही खासगी डॉक्टरांनी काम बंद केल्यानंतर पालिकेचा खर्च पाण्यात गेल्याची टीका नगरसेवक करीत आहेत. तसा प्रकार जिमखाना येथील सुविधा आणि कृत्रिम श्वसन यंत्रणांसंदर्भात होऊ नये अशी मागणी आमदार प्रमोद पाटील यांनी केली आहे.

ही यंत्रे शासकीय यंत्रणेकडून आली असल्याने पालिकेने ती शास्त्रीनगर, रुक्मिणीबाई रुग्णालयात बसवून घ्यावीत. उरलेली जिमखान्याला ठेवावीत. याची दखल घेतली नाही तर हा विषय राज्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणण्यात येईल, असे आमदार प्रमोद पाटील यांनी सांगितले.

आरोग्य विभागात गोंधळ

साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले, ही श्वसन यंत्रे डोंबिवली जिमखाना येथील समर्पित करोना रुग्णालयात बसविण्यात येणार आहेत. याविषयी आपणास वस्तुस्थिती माहिती नाही. आपण माहिती घेऊन सांगू. वैद्यकीय प्रमुख डॉ. अश्विनी पाटील यांनी यामधील काही यंत्रे सावळाराम महाराज केंद्रात बसविली आहेत. डॉ. कदम यांच्या काळात ती आली आहेत. आपण रजेवर गावी असल्याने डॉ. पानपाटील यांच्याकडून सविस्तर माहिती घ्या, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

१५ दिवसांपूर्वी पंतप्रधान काळजी निधीतून पालिकेला ३० कृत्रिम श्वसन यंत्रे मिळाली आहेत. ही यंत्रे जिमखाना येथील करोना रुग्णालयात बसविण्यात येणार आहेत. हे केंद्र गुरुवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

– डॉ. समीर सरवणकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी