नितीन कंपनी चौकातील सिग्नल यंत्रणा लवकरच कार्यान्वित
पूर्वद्रुतगती महामार्गाला भेदून जाणाऱ्या आणि जुन्या-नव्या ठाण्याची सीमारेषा मानला जाणाऱ्या नितीन कंपनी चौकातील सिग्नल यंत्रणा पूर्ववत करण्याचा निर्णय महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे घेतला आहे. ठाण्याच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या चौकात सिग्नल यंत्रणा सुरू झाल्यास संपूर्ण शहरातील वाहतुकीला आणखी शिस्त लागण्याची चिन्हे आहेत.
द्रुतगती महामार्गावरील तीन हात नाका, नितीन कंपनी आणि कॅडबरी जंक्शन हे तीन प्रमुख चौक वाहतूक कोंडीचे आगार मानले जातात. नौपाडा, पाचपाखाडी, खोपट यासारखा परिसर ओलांडून वागळे इस्टेट, वर्तकनगर, घोडबंदर भागात जायचे असल्यास या चौकांमधील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यापैकी नितीन कंपनी चौकात तर सिग्नल यंत्रणाही अस्तित्वात नाही. त्यामुळे येथील वाहतुकीचे नियोजन करताना पोलिसांच्या अक्षरश: नाकी नऊ येतात. हे लक्षात घेऊन येत्या काळात हाती घेण्यात आलेल्या वाहतूक सुधारणा कार्यक्रमात नितीन कंपनीचा सिग्नल सुरू करण्याचा प्रस्ताव महापालिकेने वाहतूक पोलिसांपुढे ठेवला आहे.
ठाणे महापालिकेने आखलेल्या वाहतूक सुधारणा कार्यक्रमात तीन हात नाका, नितीन कंपनी चौक आणि कॅडबरी जंक्शन परिसरातील वाहतूक कोंडीवर उतारा शोधण्यासाठी विविध उपाय आखण्यात आले आहेत. हे करत असताना महापालिकेने तीन हात नाका चौकातील सिग्नलच्या वेळा कमी करण्यासाठी काही उपाय आखले असून नितीन कंपनी चौकात नव्याने सिग्नल कार्यान्वित करण्याचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे. सध्या नितीन कंपनी चौकात सिग्नल यंत्रणा अस्तित्वात नाही. त्यामुळे पाचपाखाडी भागातून लोकमान्यनगर, काजूवाडी, वर्तकनगर, सावरकरनगर या भागात ये-जा करणाऱ्या वाहनांची या चौकात गर्दी होते. सिग्नल नसल्यामुळे वाहनचालक मनमानी पद्धतीने गाडय़ा हाकत असल्याने येथे वाहतूक कोंडी होते. हे लक्षात घेऊन या चौकात सिग्नल कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने वाहतूक पोलिसांकडे पाठविला आहे.

..पण नियोजनाचे काय?
नितीन कंपनी चौकात चारही दिशांनी वाहनांचा भार असतो. त्यामुळे ही यंत्रणा कार्यान्वित करण्यापूर्वी सेवा रस्त्यांवरील वाहनांच्या नियोजनाचा विचार करावा लागेल, अशी माहिती वाहतूक विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.