वर्सोवा पुलाला तडे गेल्यामुळे गेल्या सात महिन्यांपासून या खाडीवरील वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. पुलाला तडे का गेले, ते गेल्यावर काय करायला हवे होते आणि सध्या काय उपाययोजना सुरू आहेत हे पाहून प्रशासन किती हलगर्जीपणा दाखवते ते दिसून येते. आता पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे, पण अजून त्याला चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना तूर्तास दिलासा मिळणे कठीणच आहे.

प्रशासकीय ढिसाळपणा आणि हलगर्जीचा फटका हा सर्वसामान्य लोकांना बसत असतो. लोकांचा नाइलाज असल्याने तो त्यांना सहन करावा लागता. प्रशासकीय हलगर्जीपणामुळे समस्या निर्माण होतात, पण तरी ती दूर करण्यातही तत्परता दाखवली जात नाही. लोक समस्यांनी त्रस्त असतानाही खाबूगिरी सुरू असते. हे सर्व सध्या पाहायला मिळत आहे ते वर्सोवा खाडीवरील पुलावर. या पुलाला तडे गेल्यामुळे गेल्या सात महिन्यांपासून या खाडीवरील वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. पुलाला तडे गेल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई, ठाण्याकडे जाताना तसेच मुंबईहून वसई, पालघर आणि गुजरातला जाणाऱ्या वाहनचालकांना किमान एक तास वाहतूक कोंडीत अडकावे लागते. कारण अर्धा तास ही वाहतूक अडवून टप्प्याटप्प्याने वाहतूक सोडली जाते. तडे का गेले, ते गेल्यावर काय करायला हवे होते आणि सध्या काय उपाययोजना सुरू आहेत हे पाहून प्रशासन किती हलगर्जीपणा दाखवते ते दिसून येते. आता पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे, पण अजून त्याला चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना तूर्तास दिलासा मिळणे कठीणच आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरूनच गुजरात आणि पुढे उत्तरेकडे जाता येते. वसई खाडीवरून वर्सोवा पुलावरून हा मार्ग जातो. वसई खाडीवरील पूल १९७३ साली वाहतुकीस खुला करण्यात आला होता. हा पूल ५० वर्षांहून अधिक जुना आहे. या पुलाच्या एका गर्डरला सप्टेंबर महिन्यात तडे गेल्याचे लक्षात आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून हा पूल सप्टेंबरपासून अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे. सध्या या पुलावरून केवळ हलकी वाहनेच सोडण्यात येतात. पुलाच्या दोन्ही बाजूने हलकी वाहने २५ ते ३० मिनिटे थांबवली जातात आणि एका बाजूने वाहने सोडण्यात येतात. अर्धा तास एका बाजूची वाहतूक बंद केली जात असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात आणि अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मुंबई आणि ठाण्याला जाण्यासाठी किमान पाऊण तास आधी निघावे लागते. कारण अर्धा तास वाहतूक थांबते आणि पुढील पंधरा मिनिटे वाहतूक नियमित व्हायला लागतात. एकदा वाहतूक थांबली की किमान ३ ते ४ किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. यामुळे वेळ जातो आणि वाहनकोंडीच्या त्रासाचा वाहनचालकांना सामना करावा लागतो.

..तर धोका टळला असता

काही महिन्यांपासून वाहनचालकांना मोठय़ा वाहतूक कोंडीचा हा त्रास सहन करावा लागत आहे. पण हा धोका २०१४ मध्येच एका महामार्ग प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याच्या लक्षात आला होता. त्यांनी तशा सूचना करूनही अवजड वाहनांची वाहतूक सुरूच ठेवल्याने दुसऱ्यांदा तडे गेले आहे. सुदैवाने दुर्घटना घडली नाही एवढाच काय तो दिलासा. सावधगिरीच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने वाहनचालकांना ही मोठी किंमत चुकवावी लागत आहे. यापूर्वी डिसेंबर २०१३ मध्ये पुलाला तडे गेले होते. आयआरबीचे प्रकल्प संचालक पी. के. सिन्हा यांनी पुलाची पाहणी केल्यानंतर ११ जून २०१४ रोजी सर्व पोलीस, जिल्हाधिकारी इतर शासकीय यंत्रणांना सूचना दिली होती. या पुलावरून १५ टनांपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांना परवानगी देण्यात येऊ  नये, असे या पत्रात म्हटले होते. मात्र पत्राकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि अवजड वाहनांची वाहतूक सुरूच होती. त्यामुळे पुन्हा पुलाला तडे गेले आणि हे नवीन संकट उभे राहिले. या पत्राची दखल घेत केंद्रीय मंत्र्यांपासून सर्व अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करून ट्वीट करूनही काहीच हालचाल झाली नव्हती.

म्हणून होते वाहतूक कोंडी..

वाहनांची वाहतूक वळविण्यासाठी पुरेसे पोलीस नव्हते. आमच्याकडे पुरेसे पोलीस नसल्याचे वसई पोलिसांनी आधीच स्पष्ट केले होते. महाराष्ट्र पोलीस कल्याण बोर्डाकडून पोलीस मिळण्यास विलंब झाला. आयआरबी कंपनीने आपली माणसे पुरविणे आवश्यक होती. परंतु ती त्यांनी पुरवली नव्हती. या महामार्गावर अनेक समस्या पूर्वीपासूनच कायम आहेत. पण पायाभूत सुविधा न उभारल्याने वाहतूक कोंडीत भर होत आहे. महामार्ग प्राधिकरणाने सव्‍‌र्हिस रोड बांधलेले नाहीत. पुलाखाली अतिक्रमणे झाली आहेत. मुंबईत रात्री ९ नंतर अवजड वाहनांना प्रवेश असतो. ही सगळी ट्रक आणि अवजड वाहने या महामार्गावर थांबतात. त्यांच्यासाठी ट्रक बे प्रस्तावित आहे. परंतु तो बांधला गेलेला नाही. ही अवजड वाहने रस्त्यावर उभी असतात. त्यामुळेदेखील वाहतूक कोंडी होते.

पूल कधी सुरू होणार?

पुलाला तडे गेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वाहतुकीवर र्निबध घालण्यात आले. पण पुलाची नेमकी दुरुस्ती कुठे करायची हे सुरुवातीला समजत नव्हते. राम्बोल इंडिया लिमिटेड या कंपनीकडे दुरुस्तीचे काम देण्यात आले आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात सुरू होईल असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात दुरुस्तीचे काम सुरू व्हायला वेळ लागला, त्यांनी दुरुस्तीचा अहवाल आयआयटीला सादर केलेला आहे. परंतु त्यावर अहवाल मिळण्यास विलंब झाल्याने काम उशिरा सुरू झाले. पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी चार महिन्यांचा वेळ प्रस्तावित आहे. पर्याय म्हणून वसई खाडीवर पाच पदरी नवीन खाडी पूल बनविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून विविध परवानग्या घेण्याचे काम सुरू आहे. मात्र हा पूल तयार होण्यासाठी चार ते पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. वाहनचालकांचा त्रास लवकर संपणार नाही हे स्पष्ट झाले आहे. पुलाला पडलेल्या तडय़ानंतर प्रशासन किती कमकुवत आणि खचलेले आहे हे दिसून आले आहे.

अवजड वाहनांची वाहतूक का झाली?

पूल कमकुवत असल्याने अवजड वाहनांना या पुलावरून प्रतिबंध करण्यात आलेला आहे. पालघर जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी ऑक्टोबर महिन्यात वाहनबंदीचे आदेश काढले होते. जुन्या पुलावरून अवजड वाहनांना प्रतिबंध घालण्यासाठी कमानी उभारलेल्या आहेत. या आदेशानुसार जुन्या वर्सोवा खाडीवरील अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून गुजरातहून मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने येणारी वाहतूक तीन ठिकाणांहून वळविण्यात आली आहे. मात्र हे आदेश धुडकावून राजरोसपणे ही वाहतूक सुरूच असल्याने निदर्शनास आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या मार्गावरून वाहने वळवण्याचे आदेश दिले होते, त्या मार्गावरून वाहने वळवली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. पालघरचे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनीही आदेशाचे १०० टक्के पालन होत नसल्याचे मान्य केले होते. वाहने वळविण्यासाठी मनुष्यबळ नसल्याचे कारण पोलिसांनी दिले होते तर आयआरबी कंपनीने माणसे पुरवली नव्हती. ठाणे आणि पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून वाहतूक थांबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र वळविण्यात आलेल्या मार्गावरून वाहने जात नाहीत. या मार्गावर आयआरबी कंपनीचे टोल नाके आहेत. त्यांना फायदा मिळावा म्हणून पोलीस वाहने वर्सोवा पुलावरून सोडतात, असा आरोप अ‍ॅड. जिमी घोन्साल्विस आणि भूमिपुत्र संघटनेच्या सुशांत पाटील यांनी केला होता. विशेष म्हणजे ठाण्याच्या पोलीस उपायुक्तांनीही याबाबत ठाणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांना लेखी पत्र पाठवले होते. टोल कंपनीला फायदा व्हावा म्हणून पोलीस अवजड वाहने जुन्या पुलावरून सोडत आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होतेच, शिवाय पुलाला मोठा धोका निर्माण झाल्याचे पोलीस उपायुक्त संदीप पालव यांनी आपल्या लेखी पत्रात म्हटले आहे.