17 November 2017

News Flash

पूल खुला, कोंडी कायम!

या पुलावरून हलक्या वाहनांसोबतच ४९ टनांपर्यंतच्या अवजड वाहनांना जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.

प्रतिनिधी, भाईंदर | Updated: May 19, 2017 1:49 AM

 

वर्सोवाचा जुना खाडी पूल वाहतुकीसाठी खुला; ४९ टनांपर्यंतच्या अवजड वाहनांना परवानगी

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा येथील जुना खाडी पूल गुरुवारी सकाळपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या पुलावरून हलक्या वाहनांसोबतच ४९ टनांपर्यंतच्या अवजड वाहनांना जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्याचबरोबर हलक्या आणि अवजड वाहनांसाठी या पुलावर दोन स्वतंत्र विभाग तयार करण्यात आले असून वाहतूक पोलिसांकडून त्याप्रमाणे वाहनांचे नियोजन केले जात असल्याने आजही या ठिकाणी वाहतूक कोंडी कायम होती.

जुन्या पुलाचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर हलक्या वाहनांसाठी खुला असलेला हा पूल १४ मेपासून त्याची वजन पेलण्याची क्षमता तपासणीसाठी चार दिवस पूर्णपणे बंद करण्यात आला होता. तपासणीनंतर अवजड वाहनांचे वजन पेलण्याइतपत पुलाची क्षमता असल्याचे पत्र ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानंतर गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. दरम्यान, वाहतुकीसाठी पुलाचे दोन भाग करण्यात आले असून डावीकडच्या साडेतीन मीटर रुंदीच्या भागातून ४९ टनांपर्यंतची अवजड वाहने जाणार असून उजवीकडच्या अडीच मीटरच्या पट्टय़ातून हलकी वाहने सोडण्यात येणार आहेत. या भागातून केवळ हलकी वाहनेच जातील याची खबरदारी घेण्यासाठी पुलाच्या प्रवेशाच्या ठिकाणी तीन मीटर उंचीचा संरक्षक कठडा उभारण्यात आला आहे. या कठडय़ाच्या खालून जाऊ शकतील त्याच हलक्या वाहनांना पुलाच्या या भागात प्रवेश मिळणार आहे.

नऊ महिन्यांनंतर वाहतूक सुरू

गेल्या वर्षी महाड पूल दुर्घटना झाल्यानंतर राज्यातल्या सर्वच पुलांची तपासणी करण्यात आली. त्यात वर्सोवा पुलाच्या एका गर्डरला तडे गेल्याचे दिसून आले. सुमारे ४५ वर्षे जुना झालेला हा पूल कमकुवत झाला आहे. यासाठीच त्याच्या शेजारी नवा पूल बांधण्यात येणार आहे. सध्या जुन्या पुलासोबतच या ठिकाणी आणखी एक पूल सध्या उपलब्ध असला तरी या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण लक्षात घेता पुलाची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक होते. त्यामुळे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अवजड वाहनांसाठी पूल बंद करण्यात येऊन तो केवळ हलक्या वाहनांसाठीच खुला करण्यात आला. अवजड वाहने नव्या पुलावरून वळविण्यात आल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ लागली. किमान वीस ते पंचवीस मिनिटे या वाहतूक कोंडीत अडकावे लागत होते. त्यामुळे दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी दबाव वाढत होता; परंतु सुरुवातीच्या काळात पुलाचे मूळ आराखडे मिळण्यास झालेला उशीर, दुरुस्ती नेमकी कशी करायची याबाबत लवकर न झालेला निर्णय यामुळे पुलाचे दुरुस्तीचे काम लांबणीवर पडत होते. अखेर फेब्रुवारी महिन्यात दुरुस्तीच्या कामाला मुहूर्त मिळाला. मे महिन्याच्या अखेरीस काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र पंधरा दिवस अगोदरच हे काम पूर्ण करण्यात आले. पुलाची दुरुस्ती करण्यात आली असली तरी पुलाची एकंदरच अवस्था तितकीशी चांगली नाही. त्यामुळे या ठिकाणी प्रस्तावित असलेल्या नवीन पूल बांधणीच्या कामाला लवकर सुरुवात करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

पुलाचे वाहतुकीसाठी दोन भाग

पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने वाहनचालकांना दिलासा मिळणार असला तरी वाहतूक कोंडीतून पूर्णपणे सुटका मिळण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. वाहतुकीसाठी पुलाचे हलक्या आणि अवजड वाहनांसाठी असे दोन भाग करण्यात आले असल्याने या भागातून संबंधित वाहने जातील याची दक्षता वाहतूक पोलिसांकडून घेतली जात आहे आणि यासाठी पोलिसांनी सध्या वाहनांचे तसे नियोजन करावे लागत आहे. त्यामुळेच वाहने पुलावरून योग्य रीतीने मार्गस्थ करण्यासाठी वेळ लागत असून आजच्या पहिल्या दिवशीदेखील वाहने पंधरा ते वीस मिनिटे कोंडीत अडकत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. ही परिस्थिती सुरळीत होईपर्यंत आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे.

First Published on May 19, 2017 1:49 am

Web Title: versova bridge traffic issue 2