राज्यात करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना राज्य सरकारही कठोर निर्णय घेताना दिसत आहे. खबरदारी म्हणून राज्यात नाइट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. पण अजूनही करोनाबाबत लोकं गंभीर नसल्याचं समोर आलं आहे. कल्याण-डोंबिवलीतल्या चक्क कोविड सेंटमध्येच दारु पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

डोंबिवली महापालिकेच्या सावळाराम स्पोर्ट्स कॉम्पलेक्समध्ये असलेल्या कोविंड सेंटरमधील हा व्हिडीओ आहे. धक्कादायक म्हणजे कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांनीच दारु पार्टी आयोजित केली होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाने हे सेंटर चालवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला दारु पार्टी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

डोंबिवली क्रीडासंकुलातील कोविड सेंटर मनपाने एका कंत्राटदारास चालविण्यास दिले आहे. या सेंटरजवळच कर्मचाऱ्यांसाठी एक शेड उभारण्यात आले आहे, ड्युटी संपल्यावर तिथे ते पार्टी करत होते. तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीने पार्टीचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून कल्याण-डोंबिवली महापालिकेवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.