पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; आचारसंहिता लागू झाल्यापासून ६० हून अधिक गुन्हे दाखल

विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर वसई-विरार शहरात मोठय़ा प्रमाणावर मद्य वितरित केले जात आहेत. त्यासाठी गावठी मद्याचा पुरवठा केला जात असून इतर राज्यांतूनही बेकायदा मद्य आणले जात आहे. या मद्य व्यवहाराविरोधात कारवाई करण्यासाठी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिसांनी विविध ठिकाणी छापे मारून ५६, तर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १२ गुन्हे दाखल केले आहेत.

निवडणुकीच्या काळात सीमेलगतच्या भागातून बेकायदा मद्याची वाहतूक केली जाते. त्याशिवाय जिल्ह्यातील जंगल परिसरातही गावठी दारूची निर्मिती केली जात आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वसई पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्यामार्फत विशेष मोहीम सुरू करून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध मार्गानी तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. बाहेरच्या राज्यातून येणारी मद्य, गावठी मद्य, त्यासाठी वापरण्यात येणारी रसायने, वाहने यावर जप्ती आणून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये वसईच्या विभागाच्या परिसरात असलेल्या सातही पोलीस ठाण्यांतर्गत मोठय़ा प्रमाणात कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये आतापर्यंत ५६ गुन्हे दाखल  करण्यात आले असून १४ लाख २७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती वसई अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी दिली आहे. तसेच ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असून सातही पोलीस ठाण्यांतील अधिकारी याकडे लक्ष ठेवून असल्याचेही सागर यांनी सांगितले. तसेच राज्य उत्पादन

शुल्क विभागाकडून आतापर्यंत १२ गुन्हे दाखल केले असून ११ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग निरीक्षक व्ही. एस. मासमार यांनी दिली आहे.

वसईच्या पोलीस ठाण्यांत दाखल झालेले गुन्हे

  •  वालीव – २७
  •   वसई – ०४
  •  नालासोपारा- ०३
  •   तुळिंज- ०७
  •   अर्नाळा – ०४
  •   विरार- ११