|| सागर नरेकर

दहा वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पप्पू कलानी यांचा पराभव करत उल्हासनगरमध्ये भाजपचे कुमार आयलानी यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. तेव्हा या शहरातून कलानी पर्व संपले असेच काहीसे वातावरण होते. पाच वर्षांपूर्वी मोदी लाटेतही कलानी यांच्या पत्नी ज्योती यांनी आयलानी यांचा पराभव करत उल्हासनगरमध्ये पुन्हा कलानी कुटुंबीयांचे वर्चस्व स्थापन केले ते आजतागायत कायम आहे. महापालिका निवडणुकीत भाजपनेही पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी यांना साथीला घेत शिवसेनेला शह दिला. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीतही भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी कलानी कुटुंबीय आग्रही आहेत.

सध्या आमदार, महापौरपद कलानी कुटुंबाकडे आहे. येत्या निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर कलानी कुटुंबीयांपैकी कुणीतरी निवडणूक लढवणार हे स्पष्टच आहे. एकेकाळी कलानी कुटुंबीयांच्या दडपशाहीच्या नावाने संपूर्ण जिल्ह्य़ात आंदोलन करणाऱ्या भाजपला याच कुटुंबाची आता गरज पडावी हे खरे तर जुन्या निष्ठावंतांसाठी धक्कादायक आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्य़ातील जुन्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये तसेच संघ कार्यकर्त्यांमध्ये यामुळे अस्वस्थता आहे. मात्र, निवडून यायचे हा एकमेव निकष सध्या पक्षाने समोर ठेवल्याने जुन्या जाणत्यांच्या अस्वस्थतेचे पक्षश्रेष्ठींना काहीही घेणे-देणे नाही, असे एकंदर वातावरण आहे.

देशातील सर्वात दाटीवाटीचे आणि व्यापारी शहर म्हणून उल्हासनगर ओळखले जाते. उल्हासनगर शहराचा राजकीय इतिहास रक्तरंजित आहे. कुख्यात गुंड आणि सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला सुरेश ऊर्फ पप्पू कलानी २००९पर्यंत मतदारसंघात आमदार म्हणून सक्रिय होते. दोन वेळा तुरुंगातून निवडणूक लढवत जिंकून येण्याची किमया कलानीने केली होती. सिंधीबहुल या मतदारसंघावर सिंधी आमदारांचेच वर्चस्व राहिले आहे. भाजपच्या कुमार आयलानी यांनी २००९मध्ये कलानीला धूळ चारली होती. मात्र पप्पू कलानी नावाचा करिष्मा २०१४च्या भाजपच्या लाटेतही पाहायला मिळाला. राज्यभर भाजपच्या जागा वाढत असताना तत्कालीन आमदार कुमार आयलानी यांना पराभवाचा धक्का बसला. पप्पू कलानी यांच्या पत्नी ज्योती कलानी या आमदार म्हणून निवडून आल्या. त्यामुळे शहरात पुन्हा कलानी समर्थक सक्रिय झाले. पप्पू कलानी याचा मुलगा ओमी कलानी याने आपल्या ‘टीम ओमी कलानी’ या राजकीय गटाच्या माध्यमातून आपले राजकारण सुरू केले. त्याचाच परिणाम म्हणून २०१७मध्ये झालेल्या उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत कलानी कुटुंबाच्या गुन्हेगारीवर टीका करणाऱ्या भाजपला ओमी कलानी गटाला सोबत घेत निवडणूक लढवावी लागली. कलानी नावावरच भाजपला उल्हासनगरात आपला महापौर बसवता आला. त्यामुळे कलानी कुटुंबाशिवाय पर्याय नाही, असा संदेश शहरभर गेला. त्यानंतर एकाच वर्षांत भाजपने पंचम कलानी यांना महापौरपदी विराजमान केले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही कलानी कुटुंबाला भाजपकडून झुकते माप दिले जाईल अशी चर्चा आहे.

मतदारसंघातील समस्या

गेल्या काही वर्षांत उल्हासनगर शहरातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न गंभीर बनला आहे. नुकताच राज्य शासनाने याबाबत निर्णय दिला असून त्याचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सूचना हरकती मागवल्या जात आहेत. शहरातील महत्त्वाच्या जागा महापालिकेच्या नावावर करण्यासाठी आमदार ज्योती कलानी यांनी प्रयत्न केले होते. शहरातील कोंडी सोडवणे, कचरा प्रश्न, वाहतुकीचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. रस्ते रुंदीकरण करून काँक्रीटीकरण अद्याप शहरात होऊ  शकले नाही. विशेष म्हणजे काँक्रीट रस्त्यांची मुहूर्तमेढ राज्यात उल्हासनगर याच शहरात रोवली गेली होती. कल्याण-बदलापूर रस्ता अर्धवट राहिला आहे. शहराला आकार देणे कोणत्याही आमदाराला अद्याप जमलेले नाही.

मतदार म्हणतात,

दाटीवाटीचे शहर असलेल्या उल्हासनगरात प्रशस्त रस्ते, पाणी आणि शौचालय यांसारख्या प्राथमिक सुविधा देणे गरजेचे होते. मात्र त्यात यश आलेले दिसत नाही. सरकारी शाळा आणि रुग्णालयाची परिस्थिती बिकट झाली आहे. महिला आमदार म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा होत्या. – सरिता खानचंदानी, हिराली फाऊंडेशन, उल्हासनगर

गेल्या काही वर्षांत उल्हासनगर शहराला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. कल्याण-मुरबाड रोड रुंद  झाला आहे. शहरातील अंतर्गत रस्तेही अशाच प्रकारे रुंद व्हावेत ही अपेक्षा आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.  – निशांत शिरसाठ, व्यापारी, उल्हासनगर

जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे. शासकीय जमिनी पालिकेच्या नावावर करण्यात यश आले आहे. जिन्स उद्योगाच्या परवानग्या वेळेत मिळाल्यास रोजगाराचा प्रश्न मिटेल. – ज्योती कलानी, आमदार