बिबटय़ांप्रमाणेच बालनाटय़े आज दुर्मीळ होत चालली आहेत. पण ती नष्ट होऊ देऊ नका, असे कळकळीचे आवाहन ज्येष्ठ नाटय़कर्मी विद्याताई पटवर्धन यांनी गुरुवारी येथे केले. जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना त्या बोलत होत्या.

हा माझा नव्हे, तर बालरंगभूमीचा सन्मान आहे. मला सुधाताई करमरकर आणि सुलभाताई देशपांडे यांची याक्षणी तीव्र आठवण होते. ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांनाही याप्रसंगी जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

९८व्या नाटय़संमेलनात नाटककार गो. ब. देवल स्मृती वार्षिक पुरस्कार सोहळा संपन्न झाला. त्यात २०१७ सालातील विविध नाटय़प्रवाहांतील लक्षणीय योगदानाबद्दल रंगकर्मीचा विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. प्राजक्ता देशमुख, सुनील देवळेकर, धनश्री लेले, अशोक हांडे, भरत जाधव, प्रदीप मुळ्ये, स्वप्निल जाधव, पंढरीनाथ कांबळी, ऋतुजा बागवे, सिद्धार्थ बोडके, शुभांगी सदावर्ते, मानसी जोशी, पौर्णिमा अहिरे-केंडे, केतकी चैतन्य आदींना वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. सवरेत्कृष्ट नाटकाचा बहुमान ‘संगीत देवबाभळी’ला मिळाला.

नाटककार  गो. ब. देवल यांच्या नाटय़पदांचे संमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार यांच्या निरूपण आणि आठवणींसह सादरीकरण झाले. त्यानंतर शिलेदार यांची मुलाखत धनश्री लेले यांनी घेतली. यावेळी ‘स्वरसम्राज्ञी’ नाटकातील एक प्रवेश त्यांनी ज्ञानेश पेंढारकर यांच्या साथीने सादर केला.

जुन्या-नव्या रंगकर्मीचा प्रयोगशीलतेवर भर

ठाणे : कुठले नाटक चालेल, याचा कोणताही विशिष्ट फॉम्र्युला नसतो. उत्तम विषय, आशय आणि नावीन्यपूर्ण मांडणी असणाऱ्या नाटकाला रसिक चांगला प्रतिसाद देतात. त्यामुळे सातत्याने नवे प्रयोग करत राहिले पाहिजे, अशा प्रकारचे विचार नाटय़संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी डॉ. हेमू अधिकारी रंगमंचावर आयोजित ‘सांस्कृतिक आबादुबी’ या परिसंवादात मराठी रंगभूमीवरील जुन्या-नव्या रंगकर्मीनी व्यक्त केले.

या परिसंवादात डॉ. जब्बार पटेल, पुरुषोत्तम बेर्डे, प्रतिमा कुलकर्णी, संतोष पवार, केदार शिंदे, जितेंद्र जोशी, चिन्मय मांडलेकर, ऋषीकेश जोशी, प्रियदर्शन जाधव,अद्वैत दादरकर, प्रताप फड, देवेंद्र पेम यांनी आपापली मते मांडली.

नाटय़गृहांची देखभाल दुरुस्ती सांस्कृतिक विभागाकडे?

ठाणे : राज्यातील नाटय़गृहांची परिस्थिती दयनीय असल्याचे सर्वेक्षणातून उघड झाले आहे. त्यावर उपाय म्हणून नाटय़गृहांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सांस्कृतिक विभागाकडे  द्यावी, असा प्रस्ताव नगर विकास खात्याकडे पाठवल्याची माहिती शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी संमेलनस्थळी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

या नाटय़गृहांची मालकी स्थानिक स्वराज्य संस्थांकडेच असेल, त्यामुळे त्यांचे उत्पन्नाचे साधन अबाधित राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दुरुस्तीच्या खर्चाबाबत व्यावसायिकांकडून सामाजिक बांधिलकी योजनेतून मदत घेण्याचाही विचार असल्याचे त्यांनी सांगितले. नाटय़संमेलनात काही कार्यक्रम रात्री १२.३० तसेच पहाटे ३ असे अवेळी आहेत. तरीही रसिकांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.