दरड कोसळणे, अपघाताच्या घटनांवर तात्काळ उपाययोजनांसाठी उपयोग

बदलापूर : भाजीपाला, दूध अशा जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसह ठाणे, मुंबई अहमदनगर जिल्ह्यांशी जोडण्यासाठी कल्याण-अहमदनगर महामार्ग महत्त्वाचा आहे. मात्र माळशेज घाटात पावसाळ्यात दरड कोसळणे आणि अपघातामुळे हा घाट धोकादायक बनतो. त्यामुळे आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने या घाटरस्त्यात दक्षता पथक तैनात केले जाणार आहे.

एखादी दुर्घटना घडल्यास तातडीने मदत पोहोचवण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे. या पथकात पोकलेन यंत्र, जेसीबी यंत्र, शाखा अभियंते आणि दोन कामगार तैनात ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे आपात्कालीन परिस्थितीत शीघ्र कृती करणे शक्य होणार आहे.

मुंबई-अहमदनगर मार्गावर असलेला माळशेज घाट पावसाळ्यात काही अंशी धोकादायक बनत असतो. दरड कोसळण्याच्या घटनांमुळे येथे अपघाताची भीती असते. पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटनांनंतर अनेकदा येथे मदत पोहोचवण्यात वेळ जातो. आपात्कालीन परिस्थितीत दरड हटवण्यास अधिकचा वेळ गेल्यास मार्गाची वाहतूक पूर्णपणे ठप्प होत असते. परिणामी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असतात. त्यामुळे दरड कोसळणे किंवा वाहनांच्या अपघाताच्या वेळी तातडीने मदत पोहोचवण्यासाठी आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रयत्नशील आहे. त्यासाठी माळशेज घाटात आता दक्षता पथक तैनात केले जाणार आहे. या दक्षता पथकामध्ये एक पोकलेन यंत्र, दोन जेसीबी यंत्राचा समावेश आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शाखा अभियंत्यांना नेमले जाणार असून त्यांच्यासोबत दोन कामगारही तैनात केले जाणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता संजय उत्तरवार यांनी नुकतीच याबाबत माहिती दिली आहे. या दक्षता पथकामुळे अपघाताची तीव्रता, वाहतूक कोंडी आणि अडथळे तातडीने दूर करण्यात मदत होणार आहे.

खड्डे बुजवले

मुरबाड तालुक्यातल्या सावर्णे ते पुणे जिल्ह्य़ातील वेशीपर्यंतच्या १२ किलोमीटरच्या घाटरस्त्यात गेल्या काही वर्षांत खड्डे पडत असल्याचे दिसून आले होते. या भागातील खड्डे बुजवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यंदा मोहीम राबवली. जवळपास दोन किलोमीटरच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले. त्यामुळे या भागात खड्डय़ांचे प्रमाण घटले. त्याचा फायदा वाहतूक सुरळीत होण्यासाठी होणार आहे.