News Flash

टॉवरमधल्या घरांमध्ये डोंगराएवढय़ा समस्या!

विघ्नेश हाइट्स नांदिवली, डोंबिवली (पू.)

विघ्नेश हाइट्स नांदिवली, डोंबिवली (पू.)

आपले घर एखाद्या चांगल्या वसाहतीत असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी अक्षरश: पै पै करून लोक पैसा जमवितात. दर महिन्यातील ठरावीक मिळकत घराचे कर्ज फेडण्यासाठी खर्ची घालतात. मात्र एवढा आटापिटा करून घर घेतल्यानंतरही काहींना मनस्ताप सहन करावा लागतो. अनेक असुविधांमुळे विकतचे दुखणे घेतले असे त्यांना वाटू लागते. सध्या डोंबिवलीतील विघ्नेश हाइट्स या सोसायटीतील नागरिक नेमका हाच अनुभव घेत आहेत. आलिशान घर तर मिळाले, पण ना धड वीज.. ना पाणी. शिवाय परिसरातील अस्वच्छतेमुळे येथे आरोग्याच्याही अनेक तक्रारी निर्माण होत आहेत.

डोंबिवली पूर्वेला अगदी हाकेच्या अंतरावर नांदिवली गावात तीन वर्षांपूर्वी विघ्नेश हाइट्स ही सोसायटी उभी राहिली. गेली काही वर्षे नांदिवली परिसराचा झपाटय़ाने विकास होत आहे. ग्रामीण पट्टा असला तरी येथे मोठय़ा टोलेजंग इमारती उभ्या राहत आहे. आपलेही घर एखाद्या आलिशान टॉवरमध्ये असावे अशीच इच्छा सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे येथे राहायला येणाऱ्या रहिवाशांचीही होती. आजूबाजूच्या वस्तीतील कुटुंबे तसेच काही जण मुंबईहून येथे राहावयास आले आहेत. सातमजली बांधकाम असलेल्या या सोसायटीमध्ये एकूण ६८ सदनिका आहेत. वन रूम तसेच टू रूम सदनिका ४० ते ५० लाखांना नागरिकांनी घेतल्या आहेत. मात्र त्यातुलनेत येथे कोणत्याही सुविधा नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांना अक्षरश: नरकयातना सहन कराव्या लागत आहेत.

पाण्यापोटी दरमहा पाच हजार रुपये

यंदा उन्हाळ्यात सर्वत्रच पाणीटंचाई होती. मात्र या इमारतीतील रहिवाशांना तर तासभर पाणी मिळणेही मुश्कील होते. २४ तास पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन विकासकाने दिले होते, प्रत्यक्षात पाच मिनिटेही पाणी येत नाही, अशा येथील माहिलांच्या तक्रारी आहेत. गेल्या वर्षभराहून अधिक काळ येथील रहिवासी विकतचे पाणी पीत आहेत. इतर वापरासाठी त्यांना टँकरचे पाणी मागवावे लागते. आठवडय़ातून चार ते पाच टँकर मागवावे लागतात. त्याचा खर्च आठवडय़ाला सहा ते सात हजारांच्या घरात जातो. याशिवाय प्रत्येक कुटुंबाला दररोज २० लिटरच्या दोन बाटल्या पिण्यासाठी मागवाव्या लागतात. एक बाटली साधारण ८० रुपयांना मिळते. त्यामुळे दर महिन्याला फक्त पिण्याच्या पाण्यासाठी पाच हजार रुपये मोजावे लागत आहेत. या भीषण पाणीटंचाईमुळे रहिवाशांचे सामाजिक आणि कौटुंबिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. घरात किंवा शेजाऱ्यांमध्ये पाण्यावरून वाद होतात. त्यामुळे येथील एकता धोक्यात आली आहे. नांदिवली भागात अगदी एका कोपऱ्यात ही सोसायटी असल्याने येथे खूप कमी दाबाने पाणी येते. कधी काळी पाणी येते. त्यामुळे जरा हायसे वाटत नाही, तोच वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे पाणी येऊनही ते घेता येत नाही. अनेकदा अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने रहिवासी अस्वस्थ आहेत. येथे जवळपास अनधिकृत इमारतींचे बांधकाम सुरू आहे, त्या बांधकामांना पाणी मिळते, पण सोसायटीतील रहिवाशांना मिळत नाही. पाण्याच्या या त्रासाला कंटाळून अखेर सोसायटीतील रहिवाशांनी स्वखर्चाने हजार हजार रुपये काढून सोसायटीच्या आवारात कूपनलिका खोदली आहे. या कूपनलिकेमुळे इतर वापरासाठी तरी कमीत कमी पाणी मिळाले आहे; परंतु ते पुरे पडत नाही. शिवाय ते शुद्धही नसल्याने टँकर हा मागवावाच लागतो. पालिका अधिकाऱ्यांकडे टँकरची मागणी केली तरी ते अनेकदा टँकर देण्यास टाळाटाळ करतात. याविषयी लोकप्रतिनिधींकडे अनेकदा तक्रार केली आहे. अनेक राजकीय मंडळींनी आम्हाला सहकार्य केल्याने आम्हाला टँकर मिळतात, परंतु असे किती दिवस राजकीय मंडळींचीच मदत आम्हाला घ्यावी लागणार, असा सवालही ते करतात.

विजेचा लपंडाव

पाण्याची समस्या कमी म्हणून की काय वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठय़ामुळेही नागरिक कमालीचे हैराण आहेत. वीजपुरवठा खंडित होण्याचे काही वेळापत्रकच नाही. रात्री-अपरात्री कधीही वीज गायब होते. शिवाय ती पुन्हा कधी येईल याची काहीही माहिती नसते. कधी कधी पूर्ण दिवसभर वीजपुरवठा गायब असतो. वीज वितरण कार्यालयात संपर्क साधला तरी तिथूनही समाधानकाक उत्तरे मिळत नाहीत. या भागाची लोकसंख्या झपाटय़ाने वाढते. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर अपुरे आहेत. मात्र याविषयी कुणीच आवाज उठवीत नाही, असे सोसायटीचे खजिनदार चेतन महाजन यांनी सांगितले.

४०-४५ लाख रुपये खर्चून आम्ही येथे घर घेतले आहे. येथून हायवे जवळ आहे. पनवेल किंवा अंबरनाथला नोकरीला जायचे असेल तर येथून लवकर पोहोचता येते. त्यामुळे डोंबिवली स्थानकापासून काही दूर अंतरावर असले तरी आम्ही येथे घर घेणे पसंत केले. परंतु येथे आल्यामुळे आमच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सध्या ग्रामीण भागाचा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समावेश झाला आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली पालिकेने तरी आमच्याकडे लक्ष द्यावे. आमची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी काही तरी ठोस उपाययोजना करावी, असे आवाहन सोसायटीचे अध्यक्ष अमर गवळी यांनी केले आहे.

अस्वच्छतेमुळे आजारांचा प्रादुर्भाव 

ऐसपैस घर असावे म्हणून डोंबिवलीतील सोसायटीमधील घर सोडून आम्ही येथे टॉवरमध्ये राहावयास आलो; परंतु हीच आमची सर्वात मोठी चूक झाली. येथे पाण्याची, विजेची समस्या तर आहेच, शिवाय आरोग्याच्या समस्याही मोठय़ा प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. सध्या डेंग्यूच्या आजाराने येथील नागरिक मोठय़ा प्रमाणात त्रस्त आहेत. सोसायटीच्या मागील बाजूला दलदलसदृश परिस्थिती आहे. तेथे पावसाचे पाणी साचले असून त्यावर मोठय़ा प्रमाणात डासांची पैदास होते. डेंग्यू आणि मलेरियाबरोबरच चिकनगुनिया, त्वचेचे आजार, सर्दी, साथीचा ताप आदी विकारांचा येथील रहिवाशांना प्रादुर्भाव होतो, असे गायत्री पोतदार सांगतात. या भागात औषधफवारणी केली जावी म्हणून येथील रहिवासी पालिकेकडे तसेच लोकप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा करतात. मात्र तरीही नियमितपणे फवारणी होत नाही.

पार्किंगचा अभाव

येथे जवळपास भाजीमार्केट, शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल आदी सर्व सोयीसुविधा आहेत. रेल्वे स्थानक परिसरात जाण्यासाठी परिवहनच्या बसेस तसेच रिक्षाचा पर्याय उपलब्ध आहे. या परिसरात नव्याने इमारतींची बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांचे साहित्य अनेकदा रस्त्यावरच टाकले जाते. त्यामुळे रस्ता अडतो. पावसात येथे पाणी साचल्याने गुडघाभर पाण्यातून लहान मुलांना मार्ग काढणे कठीण होते. आता पावसाने उघडीप दिली असली तरी अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचते. यासोबतच वाहन पार्किंगची कोणतीही सोय नाही. त्यामुळे सोसायटीच्या मोकळ्या जागेत वाहने उभी केली जातात. मुलांना खेळण्यासाठी मैदान अथवा उद्यान नाही. इतकेच काय सोसायटीला साधी संरक्षक भिंतही नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 2:58 am

Web Title: vignesh heights dombivli east
Next Stories
1 मकाव पोपट
2 पुन्हा एकदा ‘संगीत सौभद्र’
3 मॉलमध्ये महिलांना लुटणारा भामटा अटकेत