कल्याण-डोंबिवली पालिकेची तब्बल ७६ लाखांची मालमत्ता कराची थकबाकी न भरणाऱ्या विजय सेल्स या इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला पालिकेच्या फ प्रभागाने शुक्रवारी संध्याकाळी सील ठोकले. डोंबिवलीतील घरडा सर्कल चौकात हे दुकान आहे.
ही थकबाकी भरणा करावी म्हणून विजय सेल्सच्या मालकाला वारंवार नोटिसा देण्यात आल्या होत्या. उल्हासनगरमधील एक बडा ठेकेदार विजय सेल्सचा नियंत्रक आहे. या ठेकेदाराचे यापूर्वीच्या आयुक्त व पालिका काही अधिकाऱ्यांशी खास संबंध होते. त्यामुळे ही थकबाकी वसूल होण्यात कर्मचाऱ्यांना अडथळे येत होते. गेल्या पंधरा दिवसापूर्वी फ प्रभागाने ही वसुली करण्याचा प्रयत्न केला.
कोणत्याही परिस्थितीत थकबाकी वसुली झाली पाहिजे म्हणून आयुक्त ई. रवींद्रन, अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी विजय सेल्सचा मालक थकबाकी भरणा करीत नसेल तर ते दुकान सील करण्याचे आदेश प्रभाग अधिकारी भरत जाधव, अधीक्षक संजय साबळे यांना दिले. तातडीने नरेश म्हात्रे, संजय कुमावत यांचे पथक घटनास्थळी जाऊन विजय सेल्सचे दुकान सील केले. थकबाकीची कारवाई सुरू असताना बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.