विजयराज बोधनकार
मला वाचनाची आवड माझ्या आईमुळे लागली. माझी आई सतत काहीतरी वाचत असायची. आई काय वाचते, याबाबत मला सतत उत्सुकता असल्यामुळे माझेही वाचन व्हायला लागले. मी आठवीमध्ये असताना ह.ना. आपटे यांचे ‘उष:काल’ हे सहाशे पानांचे पुस्तक वाचले. शिवाजी महाराजांच्या सीआयडी यंत्रणेचा त्यात उल्लेख होता. त्यानंतर ‘राजा शिवछत्रपती’ पुस्तक वाचले. शेरलॉक होम्सची पुस्तके सुरुवातीला वाचली आणि तिथून माझ्या वाचनाचा प्रारंभ झाला.
चित्रकला क्षेत्रात कार्यरत असल्याने लहानपणापासूनच चित्रांची आवड होती. पुस्तकांमध्ये असणाऱ्या चित्रांची उत्सुकता होती. आठवीत असताना मी एकांकिका लिहिली. या लिखाणासाठी वाचनाचा मला उपयोग झाला. आमच्या गावात पूर्वी धार्मिक कार्यक्रम व्हायचे. त्यामुळे तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज यांचा प्रभाव माझ्यावर होता. ‘राजा शिवछत्रपती’ आणि ‘उष:काल’ या दोन पुस्तकांनी स्वतंत्रपणे उभे राहण्याचे मला बळ दिले. मुंबईत राहायला आल्यावर माझे खऱ्या अर्थाने वाचन सुरूझाले. मुंबईत एकटा राहत असल्यामुळे एकटेपणा दूर करणारे एकमेव साधन माझ्यासाठी होते ते म्हणजे पुस्तक. शांता शेळके, जयवंत दळवी यांच्या कादंबऱ्या त्यावेळी वाचल्या. जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकत असताना राजा रवी वर्मा या चित्रकाराविषयी वाचले. अब्राहम लिंकन, शिवाजी महाराज यांची चरित्रे वाचली. ओशोंचे विचाररत्न पुस्तक वाचले. वाचनामुळे जीवनकला उलगडत गेली, असे मला वाटते. बुद्धीची भूक वाढली. त्यामुळे वाचन वाढत गेले. लोकमान्य टिळकांच्या ‘दुर्दम्य’ या पुस्तकाचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. वैचारिक लिखाण वाचायला मला जास्त आवडते. ज्या पुस्तकाने आपल्या व्यक्तिमत्त्वात बदल घडेल असे पुस्तक वाचायला आवडते. सध्या दादा कोंडके यांचा चित्रपटप्रवास मांडणारे अनिता पाध्ये यांचे ‘एकटा जीव’ हे पुस्तक वाचत आहे. विजय आनंद यांच्या चरित्रावर आधारित ‘एक होता गोल्डी’, बासु चॅटर्जीचे ‘अनुभव’ ही पुस्तकेही खूप आवडली. साहस आणि शक्यता यांचे भांडार असलेले डॉ. राम भोसले यांचे चरित्र असलेले हस्तस्पर्शी या पुस्तकाचा माझ्यावर प्रभाव आहे. अत्यंत दुर्मीळ पोथ्या संग्रही आहेत. या सर्व वाचनामुळे महापुरुषांची चित्रे रेखाटताना खूप उपयोग झाला. महात्मा फुले ते विश्वास पाटील यांची काढलेली चित्रे साहित्य संमेलनात गाजली.
महात्मा फुले यांचे समग्र वाङ्मय, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस यांच्या पुस्तकांचे वाचन झाले. हरि विष्णू मोटे यांचे ‘सर्वमंगल क्षिप्रा’ या पुस्तकातून आचार्य अत्रे आणि चित्रपट प्रवासाच्या नोंदी मनात कोरल्या गेल्या. गौरी देशपांडे यांचे लिखाण आवडते. ओशोंची पुस्तके म्हणजे वृत्तीची श्रीमंती आहे. त्यांच्या ‘न्यू मिलेनियम’ या पुस्तकाने मला आधुनिकतेचे भान दिले. पु.ल.देशपांडे यांचे समग्र वाङ्मय माझ्या संग्रहात आहे. काल्पनिक लिखाणापेक्षा वास्तववादी लिखाणात मी जास्त रमतो. खलिल जिब्रान हे माझे आवडते लेखक आहेत. अनिल अवचटांचे ‘माणसं’ हे पुस्तक खूप भावले. एकाच प्रकारच्या साहित्य वाचनात मी रमत नाही. प्रत्येक प्रकारचे साहित्य वाचायला आवडते. सर्व विषयानुरूप वाचन केल्यामुळे माझ्यातील चित्रकाराला विविधतेचे बळ मिळते. इसाक मुजावरांची चित्रपटविषयक सर्व पुस्तके माझ्या संग्रही आहेत. डॉ.आ.ह.साळुंखे यांचे ‘विद्रोही तुकाराम’ हे पुस्तक वाचले. ‘ख्रिस्त’, ‘बुद्ध’, ‘कृष्ण’ या पुस्तकातून तीन महामानव कळले. प्रबोधनकार ठाकरे यांचे ‘माझा जीवनप्रवास’ पुस्तक वाचले. सिद्धार्थ पारधेंचे कॉलनी, दया पवारांचे बलुतं, बाबुराव सरनाईक यांचे अमृताचा कुंभ अशी पुस्तके वाचली. चिं.वि.जोशींचे साहित्य माझ्या संग्रहात आहे. श्री.म.माटे यांचे ‘विचारशलाखा’, महेश एलकुंचवारांचे ‘मौनराग’, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘पाकिस्तान अर्थातच भारताची फाळणी’, नरेंद्र दाभोलकरांचे ‘ऐसे कैसे झाले भोंदू’, ‘वाटेवरच्या सावल्या’ हे गदिमांचे चरित्र वाचले. डॉ. जिल बोल्ट टेलर यांचे माय स्ट्रोक ऑफ इन्साईट वाचले. आज घरात दीड हजार पुस्तकांचा संग्रह आहे, ही माझी अमूल्य श्रीमंती आहे.
शब्दांकन – किन्नरी जाधव