वाचनाची आवड मला शालेय जीवनातूनच लागली. मी ज्या शाळेत शिकायला होतो, त्या शाळेच्या ग्रंथालयाला ग्रंथपाल नव्हते. त्या वेळी पुस्तकांचे रजिस्टर बनवण्याची जबाबदारी माझ्याकडे आली. आपसूकच पुस्तके हाती आली आणि वाचनाचा लळा लागला. आमच्या पाटकर गुरुजींनी मला काय वाचायला हवं, हे शिकवलं. त्यामुळे लहान वयातच साहित्याच्या विविध प्रकारांची ओळख झाली. पुढे कालांतराने बांदोडकर महाविद्यालयात शिकत असताना मोहन पाठकसरांचा सहवास लाभला. पाठकसरांनी मला वाचनाचे तंत्र शिकवले. कोणत्याही पुस्तकातील महत्त्वाचे ठळक मुद्दे वाचून लक्षात ठेवायचे, ही त्यांची शिकवण माझ्या वाचनाला शिस्त लावून गेली. त्यामुळे वाचनाचा वेगही वाढला. ‘माझे रंगप्रयोग’ हे रत्नाकर मतकरींचे सातशे चार पानांचे पुस्तक आठ दिवसांत माझे वाचून झाले, यामागे पाठकसरांच्या वाचनसंस्कारांचा उपयोग झाला हे निश्चित.

शाळेत असताना मी ऐतिहासिक साहित्य खूप वाचायचो. ययाती, छावा, स्वामी, देवयानी अशी पुस्तके शाळेत असताना माझी वाचून झाली. शिवाजी सावंत माझे आवडते लेखक होते. मात्र व.पु.काळेंच्या साहित्याचा प्रभाव माझ्यावर खूप आहे. लहानपणी वि.स. खांडेकरांचे साहित्य वाचायला काही प्रमाणात कठीण जायचे. पण ‘वपुं’च्या साहित्याने वाचनाचा छंद लावला. हळूहळू मग वेगवेगळे वाचन करायला लागलो. वाचन छंद वृद्धिंगत होण्यात माझा मित्र शैलेश दातार याचेही श्रेय आहे. दर आठवडय़ाला पुस्तके आम्ही एकमेकांना वाचायला द्यायचो. त्यामुळे वाचनकक्षा रुंदावत गेल्या.

सध्या सर्वच प्रकारातील साहित्य वाचतो. आर्थिक, जागतिक घडामोडींविषयीची पुस्तके असे वाचन करतो. आर्थिक घडामोडींवरील अर्थातच, जागतिक घडामोडींविषयी लिहिलेले संदीप वासलेकरांचे ‘एका दिशेचा शोध’ हे पुस्तक मला मकरंद अनासपुरेंनी भेट दिलेले आहे. ते पुस्तक  वाचत आहे. ‘लॉरेंन्स ऑलिव्हिअर’चे ‘कन्फेशन ऑफ अ‍ॅन अ‍ॅक्टर’ हे पुस्तक  वाचायचे म्हणून मी किशोर कदमच्या पुस्तकसंग्रहातून आणले आहे. कथा हा साहित्य प्रकार मला अधिक आवडतो. चित्रपट व्यवसाय असल्याने कथा साहित्य प्रकाराचा कामात उपयोग होतो. कथा वाचताना काही पात्रे तयार होतात. सध्या संग्रहात साडेपाचशे पुस्तके आहेत. दिग्दर्शनासाठी वाचनाचा खूप उपयोग होतो. पुस्तकातील एखादी ओळ बराच अर्थ सांगून जाते. काही लेखकांमध्ये दृश्य उभे करण्याची ताकद असते. जो दिग्दर्शक वाचत नाही, तो केवळ तंत्रात रमून राहतो. त्यामुळे दिग्दर्शनासाठी चौफेर वाचन असायला हवे असे मला वाटते. चित्रपटविषयक पुस्तके मी वाचतो. त्यात इसाक मुजावरांची पुस्तके, गुलजारजींची पुस्तके वाचतो. गुलजारजींची कवितांची पुस्तके वाचायला वेळ लागतो. सध्या मी त्यांचे ‘रात पश्मीने की’ हे कवितांचे पुस्तक वाचत आहे.

मिलिंद बोकिल, गुलजार, सलील कुलकर्णी हे आवडते लेखक आहेत. संदीप खरे, अशोक बागवे, किशोर कदम हे आवडते कवी आहेत. इंग्रजी साहित्य मी महाविद्यालयात असताना वाचले.  पीयूष पांडेंचे मी ‘पाँडेमोनिअम’ पुस्तक वाचले. जाहिरात विश्वातील अनुभवाबद्दल त्यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. डॉ. एस. एल. भैरप्पांचे मंद्र, मुरलीधर खैरनार यांचे शोध, अनंत सामंतांचे दृष्टी, मितवा अशी काही आवडती पुस्तके आहेत. विजय पाडळकरांचे ‘गंगा आये कहा से’, बनी रुबेन यांचे ‘राज कपूर – एक कलंदर चित्रसम्राट’, ‘कलंदर कलाकार – किशोरकुमार’, रुपेरी आठवणी अशी काही पुस्तके वाचली. डॉ. रघुनाथ शुक्ल यांचे ‘विश्व चैतन्याची अनुभूती’ हे पुस्तक आवडले.  ज्ञानेश्वरांच्या समाधिस्थळी आलेले अनुभव त्यांनी या पुस्तकात लिहिलेले आहेत.

हरवलेले ‘हसरे दु:ख

माझ्या मैत्रिणीने चार्ली चॅपलिनचे ‘हसरे दु.ख’ हे पुस्तक मला भेट दिले होते. माझा मित्र त्या वेळी भाग्यांक शिकायचा. चार्ली चॅपलिन आणि माझा भाग्यांक आठ असा सारखा आहे, हे लक्षात आल्यावर मैत्रिणीने ते पुस्तक मला दिले होते. हे पुस्तक माझ्याकडून हरवले आहे. त्या पुस्तकाची आठवण होते. मला चांगल्या वाक्यांची टिपण काढायची सवय आहे. एखाद्या पुस्तकासारखी माझी ती डायरी होती. ती वाक्ये लिहिलेली माझी डायरीही हरवलेली आहे. त्या डायरीची आठवण सतत होते.