मारहाण आणि नासधूस करण्याचा प्रकार; आठवडय़ातील दुसरी घटना हप्ता देत नसल्याने संतापलेल्या गावगुंडांनी रेल्वे स्थानक परिसरातील दुकानदारांना चोप दिल्याची घटना अगदी ताजी असताना आता बारमधील कामगारांना धमकावून कॅशिअरला मारहाण करून बारची नासधूस केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अंबरनाथ पूर्वेतील मयूर रेस्टॉरंट आणि बारमध्ये ही घटना घडली असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. अंबरनाथ पूर्वेतील पनवेलकर ग्रीन सिटी गृहप्रकल्पाजवळील मयूर रेस्टॉरंट आणि बारमध्ये ही घटना रात्री आठच्या सुमारास घडली. रेस्टॉरंटमध्ये आलेल्या दोघांनी वेटरला विनाकारण शिवीगाळ केल्याने व्यवस्थापक रवी पुजारी यांनी दोघांना बाहेर जाण्यास सांगितले. मात्र हे दोघे तरुण रेस्टॉरंटबाहेर जाताना तुला एका तासात बघतो, अशी धमकी देत बाहेर पडले. बाहेर त्यांनी इतर चौघांना बोलावून घेतले, नंतर त्यांनी बारमधील काचेच्या बाटल्या भिरकावत व्यवस्थापक यांना पिस्तूल दाखवून धमकाविण्याचा प्रयत्न केला. तसेच कॅशियर त्रिभुवनदास यांना मारहाण केली आणि इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत त्यांनाही मारहाण केली. या वेळी त्यांनी रेस्टॉरंटमध्येही तोडफोड केली. याप्रकरणी रेस्टॉरंटचे व्यवस्थापक रवी पुजारी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. मात्र इतर पाच जणांना अद्यापही ताब्यात घेण्यात आलेले नाही. अंबरनाथमध्ये सातत्याने अशा घटना घडू लागल्याने गावगुंडांची दहशत वाढत असल्याच्या तक्रारी आता व्यावसायिकांकडून केल्या जात आहेत. आठवडाभरातील या दुसऱ्या घटनेने दुकानदार आणि हॉटेल मालकांत भीतीचे वातावरण असून आम्हाला सातत्याने लक्ष केले जात असल्याच्या संतप्त भावना त्यांच्याकडून व्यक्त केल्या जात आहेत.