वसई पश्चिमेला जलवाहिन्या टाकण्याच्या कामाला मंजुरी

वसई : अनेक वर्षांपासून पालिकेच्या वतीने पुरवठा व्हावा यासाठी वसई पश्चिमेकडील नागरिकांना प्रतीक्षा होती. ती आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. पश्चिमेकडील गावांना लवकरच पाणी मिळणार आहे. गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी नव्याने जलवाहिन्या टाकाव्या लागणार असून त्याच्या पहिल्या टप्प्यातील साडेचार कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत ३१० किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. १८ जलकुंभ उभारले जाणार आहेत. या कामाचे कार्यादेश काढण्यात आले आहेत.

वसई विरार महापालिकेतील पश्चिम पट्टय़ातील गावे समाविष्ट झाली. या गावांमध्ये इतर विकासकामे झाली असली तरी अनेक गावांना अद्याप पालिकेचे पाणी मिळालेले नव्हते. वसई विरार शहराला सूर्या, उसगाव आणि पेल्हा या पाणीपुरवठा योजनांमधून प्रतिदिन २३१ दशलक्ष लिटर्स पाणी (२३ कोटी लिटर्स) पुरवठा होत असतो. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन खोलसापाडा १ आणि २ ही घरणे प्रस्तावित असून त्याच्या जलसंपदा विभागामार्फत त्यांची कामे होत आहेत. त्यातून पालिकेला १८५ दशलक्ष लिटर्स पाणी मिळणार आहे. याशिवाय पालिकेच्या देहरजी, सुसरी, सातिवली, राजिवली, कामण कवजा बंधाऱ्याची उंची वाढवणे इत्यादी प्रकल्पांच्या दृष्टीने आवश्यक ती तरतूद करण्यात आली असून मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ४०३ दशलक्ष लिटर्स योजनेची कामे प्रस्तावित आहेत. ही कामे पूर्ण झाल्यावर पालिकेला प्रतिदिन ९०० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे पश्चिम पट्टय़ातील गावांना पाणीपुरवठय़ाचा मार्ग मोकळा झाला आहे

पश्चिम पट्टय़ातील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी नव्याने जलवाहिन्या खरेदी करण्याच्या पहिल्या टप्प्यासाठी साडेचार कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. याशिवाय दुसऱ्या टप्प्यात १९ कोटींच्या जलवाहिन्या खरेदी करण्याच्या कामास मान्यता मिळाली आहे. त्यापैकी १० कोटी ५४ लाख रुपयांच्या जलवाहिन्या खरेदीच्या कामाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

जलकुंभ उभारणार

पश्चिम पट्टय़ातील अनेक गावांना पालिकेचा पाणीपुरवठा होत होता. जलवाहिन्यांची अडचण असल्याने काही गावे राहिली होती. जलवाहिन्या टाकण्या, जलकुंभ उभारणे आदी कामांचा अडसर दूर झाल्याने या गावांना लवकरच पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती, माजी पाणीपुरवठा सभापती प्रफुल्ल साने यांनी दिली.