ठाणे : ठाण्यात मंगळवारी विण्टेज कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ४० विण्टेज कार, ३० सुपर कार आणि दुचाकी या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे ठाणेकरांना दुर्मीळ वाहने एकत्रित पाहण्याची संधी मिळणार आहे. ठाणे वाहतूक पोलीस, रेमंड्स व वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल यांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यात सुरू असलेल्या रस्ते सुरक्षा मोहिमेअंतर्गत ठाणे वाहतूक पोलिसांकडून ‘सडक सुरक्षा आणि जीवनरक्षा’ हे अभियान राबविले जात आहे. वाहनचालकांना शिस्त लागावी, तसेच रस्ते नियमांचे पालन व्हावे यासाठी ठाणे पोलिसांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रजासत्ताकदिनी म्हणजेच, मंगळवारी सकाळी ११ वाजता दुर्मीळ अशा कार व दुचाकी रॅलीचे आयोजन केले आहे. वाहतूक पोलीस, रेमंड्स आणि वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल यांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचे आयोजन केले आहे. ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते या रॅलीला रेमंड्स कंपनीचे मैदान येथे हिरवा झेंडा दाखवला जाईल. या रॅलीमध्ये ४० विण्टेज कार, ३० सुपर कार आणि दुचाकींचा सहभाग असणार आहे. ही दुर्मीळ वाहने ठाणे शहरात सुमारे २० किमी परिसरात धावतील. कार पाहणे ठाणेकरांसाठी पर्वणी ठरणार आहे, असे वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

असा असेल रॅलीचा मार्ग

सकाळी ११ वाजता या रॅलीची सुरुवात रेमंड्स कंपनीच्या मैदानातून होईल. त्यानंतर पुढे शास्त्रीनगर, उपवन, काशिनाथ घाणेकर नाटय़गृह, खेवरा सर्कल, टिकुजिनीवाडी, मानपाडा, ब्रह्मांड , पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेटपर्यंत ही रॅली जाईल. त्यानंतर पुन्हा वळण घेऊन घोडबंदर रोड मार्गे कापुरबावडी, माजिवडा, मीनाताई ठाकरे चौक, कोर्ट नाका, मासुंदा तलाव, गडकरी रंगायतन, चिंतामणी ज्वेलर्स, टेंभीनाका, आंबेडकर रोड, खोपट कॅडबरीमार्गे पुन्हा रेमंड्स कंपनीच्या मैदानात रॅलीची सांगता होईल.