विवाह सोहळ्यात नियमांचे उल्लंघन

ठाणे : घोडबंदर येथील भाईंदरपाडा परिसरात परवानगीविनाच विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  या सोहळ्यादरम्यान करोना नियमावलीचे उल्लंघन करण्यात आल्याची बाब पालिका आणि पोलीस पथकाच्या निदर्शनास आली असून याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी वधू आणि वराच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला आहे.

सर्वाधिक रुग्ण असलेल्या घोडबंदर भागातील एका लग्न सोहळ्यात करोना नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. घोडबंदर येथील भाईंदरपाडा भागात सोमवारी रात्री परवानगीविनाच विवाह सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती पोलीस आणि पालिकेच्या पथकाला मिळाली होती. त्याआधारे कासारवडवली पोलीस आणि महापालिकेच्या साहाय्यक आयुक्त अनुराधा बाबर यांच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी लग्न सोहळा परवानगी घेऊन आयोजित      केल्याचा आणि नियमानुसार ५० जणच उपस्थित असल्याचा दावा आयोजकांनी केला. मात्र पथकाने केलेल्या चौकशीत परवानगीविनाच हा सोहळा आयोजित करण्यात आल्याची बाब उघडकीस आली. तसेच या सोहळ्यात १५० ते २०० जण उपस्थित असल्याचे आणि अनेक जण मुखपट्टीविना वावरत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. तसेच अंतरसोवळ्याच्या नियमाचेही उल्लंघन झाल्याचे दिसून आले, अशी माहिती कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली. तसेच याप्रकरणी वधू आणि वराच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.