जंगलामध्ये चित्त्याने केलेल्या शिकारीचे अनेक व्हिडिओ आपण डिस्कव्हरी किंवा नॅन्शनल जिओग्राफिक्ससारख्या वहिन्यांवर पाहिले असतील. मात्र मात्र सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चा सुरु आहे चित्त्याच्या एका वेगळ्याच व्हिडिओची आणि तिही अगदी वेगळ्याच कारणासाठी. सामान्यपणे चित्ता म्हटल्यावर अनेकांना आठवतो तो वेगाने धावणारा आणि हिंसक मांसाहारी प्राणी. प्राण्यांवर हल्ला करणारा चित्ता आपल्यापैकी अनेकांना माहित आहे. मात्र इंटरनेटवर सध्या माणूस आणि चित्त्यामधील वेगळच नात दाखवणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

इंडियन फॉरेस्ट सर्विसमधील आधिकारी प्रवीण कासवान यांनी ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अंगावर चादर ओढून झोपलेल्या व्यक्तीच्या बाजूला तीन चित्ते झोपलेले दिसत आहे. रात्रीच्या अंधारात एका गवताच्या छप्पराखाली हा व्हिडिओ शूट करण्यात आल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये झोपलेल्या चित्त्यांपैकी एक चित्ता उठतो आणि इकडे तिकडे पाहू लागतो. मात्र गोंधळलेल्या या चित्त्याकडे त्या व्यक्तीचे लक्ष जाते आणि ती त्याला चक्क चादरीमध्ये घेते. एकाद्या लहान मुलाला मिठी मारुन झोपावे त्याप्रमाणे ही व्यक्ती या चित्त्यांला कुशीत घेत झोपते. “एखाद्या चित्त्याला तुमच्याकडून काय अपेक्षा असेल झोपण्यासाठी काँक्रीटचा स्लॅब आणि उबदार चादर. या व्हिडिओमधील दृष्य खूपच प्रेमळ दिसत आहे. व्हिडिओ डॉल्फ सी. व्होल्क,” अशी कॅप्शन देत प्रवीण यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

हे ट्विट तीन हजार ४०० हून अधिक जणांनी रिट्विट केलं असून १४ लाखांहून अधिक जणांनी या ट्विटला लव्ह मार्क केलं आहे. मात्र व्हायरल झालेला हा व्हिडिओ कुठे शूट करण्यात आला आहे याबद्दल कोणतीही माहिती प्रवीण यांनी दिलेली नाही.