विकास आराखडय़ातील रस्त्यांच्या भूसंपादनाला महासभेत मंजुरी

वसई : विरार परिसरात होणारी वाहतूक कोंडी लवकरच सुटणार आहे. वसई-विरार महापालिकेने विकास आराखडय़ात प्रस्तावित असलेल्या रस्त्यांच्या भूसंपादनाला मंजुरी दिली आहे. मंगळवारी झालेल्या महासभेत भूसंपादनाच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.

विरार पश्चिमेतील स्थानकालगतच्या परिसरातून दररोज मोठय़ा संख्येने नागरिक, वाहनचालक प्रवास करत असतात. ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्गच उपलब्ध नसल्याने परिसरात मोठय़ा प्रमाणात कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यातच बेशिस्तपणे चालविल्या जाणाऱ्या रिक्षा, बेकायदा पार्किंग यांमुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडथळे निर्माण होत असतात. यामध्ये वाट काढताना वेळही वाया जातो, परंतु ही समस्या लक्षात घेऊन यावर पालिकेने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत होती.

यासाठी पालिकेने मंजूर विकास आराखडय़ात दर्शविण्यात आलेल्या रस्त्यांचे भूसंपादन करण्यासाठीचा प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. यामध्ये विरार पश्चिमेतील जुन्या टपाल कार्यालयाजवळचा रस्ता, प्रथमेश आर्ट ते मुख्य रस्ता, ग्रामीण रुग्णालय ते एसटी डेपो, भास्कर वामन ठाकूर मंडई ते फलाट क्रमांक १ या ठिकाणच्या रस्त्यांच्या जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे. हे भूसंपादन करत असताना तेथील जागामालक व शेतकरी यांना विश्वासात घेऊन संपादन करण्यात यावे, असे नगरसेवक सुदेश चौधरी यांनी सांगितले. शहरातील ज्या ठिकाणी आरक्षित जागा आहेत, त्या ताब्यात घेऊन नागरिकांना आवश्यक सेवासुविधा पुरविण्यासाठी याचा वापर केला पाहिजे, अन्यथा या शहराचे भवितव्य अंधारात राहील, असे मत नगरसेवक उमेश नाईक यांनी व्यक्त केले.

शिवसेना नगरसेविका किरण चेंदवणकर यांनी यावर बोलताना ज्या ठिकाणी शासकीय विभागाच्या जागा रस्त्यासाठी प्रस्तावित आहेत त्यावर लक्ष ठेवून काम करावे आपण महासभेत मंजुरी द्यायची आणि त्या ठिकाणी त्या विभागाने बांधकाम करायचे, असे प्रकार होत असतात यासाठी यावर पालिकेने लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांना आदेश

या  प्रस्तावित रस्त्याच्या भूसंपादन संदर्भात सदस्यांनी केलेल्या सूचना लक्षात घेऊन तातडीने भूसंपादन करण्यात यावे. मोबदल्याची रक्कम जागामालक रोखीने मागत असेल तर तशा प्रकारची चर्चा करून देण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी व पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.