चोरींचे प्रमाण वाढले; पाच वर्षांत ११२ घटना, ३९ लाखांवर डल्ला
रेल्वे पोलिसांकडून महिला प्रवाशांच्या सुरक्षेचे दावे केले जात असले तर प्रत्यक्षात महिला प्रवाशांना चोरांकडून लुटण्याचे प्रमाण वाढले आहे. पश्चिम रेल्वेच्या विरार आणि वैतरणा या लगतच्या दोन स्थानकांतच गेल्या पाच वर्षांत महिलांच्या डब्यात चोरीच्या ११२ घटना घडल्या आहेत. त्याच चोरांनी महिलांच्या ३९ लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारलेला आहे.
रेल्वेत भुरटे चोर सक्रिय असतात. गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे पाकीट मारणे, मोबाइल चोरणे, मंगळसूत्र चोरणे आदी गुन्हे केले जातात. गेल्या काही वर्षांत विरार आणि त्यानंतर येणाऱ्या वैतरणा या स्थानकांदरम्यान महिलांच्या डब्यात चोरीच्या ११२ घटना घडल्या आहेत. एका सामाजिक कार्यकर्त्यांने माहिती अधिकारात रेल्वे पोलिसांकडून मिळवलेल्या माहितीद्वारे ही बाब उघडकीस आली आहे.
२०१३ या वर्षांत १२ चोरीच्या घटना घडल्या असून त्यापैकी ९ गुन्हे उघडकीस आले आहेत. २०१४ या वर्षांत २० चोरीच्या घटना घडल्या असून त्यांपैकी आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. २०१५ या वर्षांत सात चोरीच्या घटना घडल्या असून त्यापैकी तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. २०१६ या वर्षांत पाच चोरीच्या घटना घडल्या असून त्यांपैकी दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. २०१७ या वर्षांत ३० चोरीच्या घटना घडल्या असून त्यांपैकी दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. २०१८ या वर्षांत जुलै महिन्यापर्यंत ३८ चोरीच्या घटना घडल्या असून त्यांपैकी दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. या सर्व प्रकरणांत तब्बल ३९ लाख रुपयांचा ऐवज लुटण्यात आला आहे. पोलिसांनी तपास करून या ११२ गुन्ह्यांपैकी २६ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
वाढत्या चोरीबद्दल महिला प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. रेल्वे पोलिसांनी मात्र महिलांच्या सुरक्षेत कसलीच कसूर नसल्याचे सांगितले आहे. आम्ही भुरटय़ा चोऱ्या करणाऱ्या अनेक टोळ्यांना पकडले आहे. चालू वर्षांतच आम्ही ३०० भुरटय़ा चोरांना अटक केली, अशी माहिती वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी दिली. आम्ही नियमित गस्ती घालत असतो, रात्री आणि दिवसाही महिलांच्या डब्यात पोलीस असतात. त्यामुळे चोरीचे प्रमाण कमी झाले आहे असे त्यांनी सांगितले. आम्ही एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर चोरांच्या टोळ्यांना अटक केल्याने यापुढे अशा भुरटय़ा चोऱ्या होणार नाही, असाही दावा त्यांनी केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 30, 2018 12:59 am