वसई-विरार महापालिकेचे करवाढ नसलेले दोन हजार कोटींचे अंदाजपत्रक सादर; आरोग्य सेवेवर भर

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

वसई :वसई-विरार महापालिकेच्या २०२१-२२ च्या मूळ अर्थसंकल्पासह २०२१-२२ या आर्थिक वर्षांचे सुमारे दोन हजार कोटींचे आणि ६५ कोटीं शिलकीचे अंदाजपत्रक पालिका प्रशासकांना सादर करण्यात आले. कोणतीही करवाढ नसलेल्या या अर्थसंकल्पात जुन्याच योजनांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.  आगामी वर्षांत विविध योजनांसाठी भरघोस आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. अंदाजपत्रकातील तरतुदींवर चर्चा केल्यानंतर त्याला प्रशासकाकडून अंतिम मंजुरी दिली जाणार आहे.

वसई-विरार महापाालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने आयुक्तांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष देहरकर यांनी गंगाथरन डी. यांना  सादर केला. पालिकेचा २०२०-२१ चा सुधारीत एक हजार ८७० कोटी ७४ लाख आणि सन २०२१-२२ चा मूळ दोन हजार २८ कोटींचे हे अंदाजपत्रक आहे. करोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटल्याने यंदाच्या अंदाजपत्रकात कुठलाही करवाढ सुचविण्यात आलेली नाही.

टाळेबंदी आणि करोनामुळे सर्वांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. महापालिकेच्या उत्पन्नालादेखील मोठा आर्थिक फटका बसला आहे. या अर्थसंकल्पाची मांडणी ही सद्यस्थितीत असलेल्या उत्पन्नाच्या आधारावर करण्यात आलेली आहे.

आवश्यक महसूली खर्च करणे, सुरू असलेले प्रकल्प तसेच मागील वर्षी निधी र्अथसंकल्पातील झालेले प्रकल्प यांचा समावेश या र्अथसंकल्पात करण्यात आलेला आहे, अशी माहिती पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी. यांनी दिली.

जुन्याच योजना नव्याने

 दहन व दफनभूमी

दहनभूमीमुळे इतर नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता.एकात्मिक दहन भूमी विकास कार्यक्रम या अंतर्गत आवश्यक सोयीसुविधा, संरक्षक भिंतींची कामे तसेच सर्वधर्मियांसाठी भूसंपादन करून दफन भूमी विकसित करणे,व ज्या दफनभूमी आहेत त्याठिकाणी विकासात्मक कामे व सौंदर्यीकरण करणे.सध्या स्थितीत १४ ठिकाणी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

उद्याने विकसित

वसई विरार शहरातील आरक्षित असलेल्या भूखंडावर महापालिकेकडून उद्याने विकसित केली जाणार आहेत. यामध्ये विरार पूर्वेतील नारंगी येथे पिकनिक पार्क व बोटनिकल पार्कचे बांधकाम, पेल्हार धरणालगत ही पिकनिकपार्क, एव्हरशाईन सिटी मधील विद्याविकासिनी शाळेजवळच्या उद्यानाचा विकास व इतर १० उद्याने विकसित केली जाणार आहे. या उद्यानविकासासाठी २३.१५ कोटींची तरतूद प्रस्तावित केली आहे.

मार्केट व्यवस्था

वसई विरार शहरातील फळविक्रेते, मासळी विक्रेते , भाजी विक्रेते यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी पालिकेकडून बाजार केंद्र ( मार्केट) उभारली जाणार आहेत. यामध्ये गोखीवरे, तामतलाव, नवघर पूर्वेतील भागात बहुउद्देशीय इमारत,नालासोपारा, निर्मळ आदी ठिकाणच्या भागात बाजार केंद्र बांधण्यात येणार आहेत.यासाठी ८.५८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

तलाव सुशोभीकरण

तलावाचे संवर्धन व्हावे यासाठी पालिकेने शहरातील तलाव सुशोभित करण्याची कामे हाती घेतली आहेत यातील अनेक तलाव सुशोभित झाले आहेत. परंतु ज्या तलावाचे सुशोभीकरण झाले नाही त्याचे येत्या काळात सुशोभीकरण केले जाणार आहे. यामध्ये विरार येथील भोंगाळे तलाव, पेल्हार येथील वाकणपाडा तलाव, नाळे तलाव यांचा समावेश आहे. यासाठी अर्थसंकल्पात २७.५९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

क्रीडा

क्रीडा क्षेत्राला वाव मिळावा यासाठी शहरात क्रिकेट खेळा व्यतिरिक्त महापालिका क्रीडा विभागाकडून सांघिक व वैयक्तिक विशेष खेळांचे आयोजन केले जाणार आहे. त्या सोबतच शाळेतील मुलांना हॉकी, फुटबॉल, टेबल टेनिस, हॉलीबॉल, बॅडमिंटन, खो—खो व इतर खेळांविषयी तज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

अपंग कल्याण</strong>

शहरातील  दिव्यांगाच्या कल्याणासाठी टक्केवारी नुसार विविध योजनांच्या अंतर्गत लाभ दिला जाणार आहे. प्रतिमाह अनुदान, व्यवसाय कर्ज, दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन अनुदान, आजारी व व्याधीग्रस्त दिव्यांगा आर्थिक साहाय्य, संस्थाना अनुदान, भौतिकोपचारी साधने आधी प्रकारचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी ६.९५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

महिला बालकल्याण

महिला व बालकल्याण यासाठीच्या विविध योजना महापालिकेकडून राबविल्या जातात यासाठी १९.१० कोटीं रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मागासवर्गीय योजना

मागासवर्गातील नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात पालिकेने २९.६४ कोटींची भरीव तरतूद केली आहे. गरीब गरजूसाठी मोफत वैद्यकीय शिबिर, समूह गटविमा योजना, दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत अनुदान,दारिद्य्र रेषेखालील नागरिकांना घरकुल योजना, मागासवर्गीय योजनेअंतर्गत विकास कामे, वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी अनुदान, कमी उत्तपन्न गटातील शेतकरी , मच्छिमार बांधव यांच्या साठी सोयीसुविधा आदी घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

महापौर सहाय्यता निधीसाठी ५० लाख

वसई विरार शहरातील गोर-गरीब नागरिकांना, अडचणीत सापडलेल्या नागरिकांना आर्थिक साहाय्य मिळावे यासाठी पालिकेच्या महापौर सहाय्यता निधी मधून मदत करण्यात येत आहे. यासाठी चालू वर्षांच्या अर्थसंकल्पात ५० लाख रुपये  इतक्या रक्कमेची तरतूद करण्यात आली आहे.

एलईडी पथदिवे

वसई-विरार शहरात रस्त्याच्याकडेला एलईडी पथदिवे लावण्यात येणार आहेत. आधी जे पथदिवे होते त्यामुळे अधिकची वीज त्यासाठी लागत असल्याने अधिकचा खर्च होत होता. आता या दिवाबत्ती खर्चात २५ ते ३० टक्कय़ांनी कपात व्हावी एलईडी पथदिव्यांवर भर दिला जाणार आहे.

आरोग्य व्यवस्था

करोनाचा धोका टळलेला नसून तो पुन्हा वाढत आहेत. त्यामुळे पालिकेने करोनानिवारणाबरोबर चांगल्या आरोग्य व्यवस्थेवर भर दिला आहे. यासाठी शहर स्वच्छतेसाठी २०३ कोटी ७५ लाख रूपये खर्च केला जाणार आहे. रुग्णालयातही ७१ कोटी ९४ लाख रूपये खर्च करून अत्याधुनिक सोयीसुविधा प्रदान केल्या जाणार आहेत.

पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्त्यावर ९० कोटी १३ लाख खर्चाची तरतूद केली आहे. तर ठेका कर्मचाऱ्यांच्या आस्थापनासाठी ८८ कोटी ८८ लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पातील वैशिष्टय़े आणि प्रमुख तरतुदी

वसईचा किल्ला संवर्धन

वसई हे ऐतिहासिक व सांस्कृतिक शहर म्हणून याची ओळख आहे. या वसईत वसईचा किल्ला आहे. परंतु त्यांच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभागाकडून पाहिजे तसे सहकार्य मिळत नाही. परंतु सध्या स्थितीत त्यांचे संवर्धन करण्यासाठी  अर्थसंकल्पात १ कोटी रुपयांची तरतूद तर वसईचा सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

वाहतूक बेट विकास

वसई विरार महापालिकेच्या हद्दीतील वाहतूक बेटे विकसित  केली जाणार आहेत. यामुळे रस्त्यांच्या सौंदर्यात भर पडणार आहे. यासाठी २ कोटी  रुपये इतकी तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

घनकचरा व्यवस्थापन

शहरात कचऱ्याचे योग्य रित्या व्यवस्थापन होत नसल्याने कचऱ्याची मोठी समस्या आहे. ही समस्या सोडविण्यासाठी पालिकेने कचराभूमीवर बायोमिथिनेशन आणि बायोमायनिंग प्रक्रियेसाठी १४७.५४ कोटींचा प्रस्ताव हा राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे दिला आहे. तर दुसरीकडे रस्त्यावरील दैनंदिन स्वच्छतेसाठी पालिका लवकरच यांत्रिक झाडू मशीन खरेदी करणार आहे.

पाणी पुरवठय़ावर भर

वसई-विरार शहरातील वाढते नागरीकरण लक्षात घेता पाण्याची समस्या निर्माण होऊ लागली आहे. ही पाण्याची समस्या सुटावी यासाठी पालिकेने केंद्र शासनाच्या अमृत योजना अभियानातून ३१० किलोमीटरची जलवाहिनी अंथरणे व विविध ठिकाणी १८ ठिकाणी जलकुंभ  बांधण्याचे काम सुरू आहे. पालिकेच्या क्षेत्रात ४६ हजार नळजोडण्या देण्यात आल्या असून टप्प्यात टप्प्याने जलमापके बसविण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. भविष्यातील पाणी नियोजनाच्या अनुषंगाने खोलसापाडा धरण १ व २ अशी धरणांच्या निर्मितीची कामे घेतली आहेत. या सर्व कामासाठी २३१.९० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

आपत्ती व्यवस्थापन

मागील दोन ते तीन वर्षांंपासून शहरात पुरस्थितीमुळे येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होते.  निर्माण होणाऱ्या या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्ष व बिनतारी संदेश यंत्रणा, जीवरक्षक बोट, पाण्याचा निचरा होण्यासाठी उंच क्षमतेचे पंप आदींसाठी १०.४८ कोटींची तरतूद  प्रस्तावित आहे.

अत्याधुनिक अग्निशमन नियंत्रण कक्ष

वसई-विरार शहर हे गजबजलेले व औद्योगिक वसाहती असलेले शहर आहे. त्यामुळे अधूनमधून या भागात आगी लागण्याचे प्रकार घडत असतात. या आगीच्या घटनांची माहिती तातडीने अग्निशमन केंद्राला मिळावी यासाठी आचोळे येथे अत्याधुनिक स्वरूपाचे अग्निशमन नियंत्रण कक्ष व संपर्क यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.