हजारो गुंतवणूकदारांची कोटय़वधींची फसवणूक

मनी ट्रेड कॉइन (एमटीसी) या आभासी चलनामध्ये पैशांची गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठय़ा रकमेचा परतावा मिळण्याची बतावणी करत गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या कंपनीचा ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने शोध घेतला आहे. या कंपनीमध्ये सुमारे अडीच हजारांहून अधिक गुंतवणूकदारांनी लाखो रुपये गुंतविले असून या गुंतवणुकीचा आकडा पाचशे कोटी रुपये इतका असण्याची शक्यता ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी वर्तविली आहे.

नवी मुंबई भागात राहणाऱ्या अमित मदनलाल लखनपाल याने ‘फ्लिनस्टोन ग्रुप’ नावाची कंपनी सुरू केली होती. गेल्या वर्षी सुरूकेलेल्या या कंपनीचा उद्घाटन सोहळा दुबईमधील एका हॉटेलमध्ये पार पडला होता. घोडबंदर भागातील बिझनेस ओरिएन्ट पार्कच्या पहिल्या मजल्यावर कंपनीचे कार्यालय थाटले होते. या कंपनीच्या माध्यमातून त्याने मनी ट्रेड कॉइन या आभासी चलनामध्ये पैसे गुंतविण्याची योजना आणली होती. या चलनामध्ये पैशांची गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठय़ा रकमेचा परतावा मिळण्याची बतावणी करत त्याने गुंतवणूकदारांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. दिल्लीतील व्यापारी प्रवीण मुकूटलाल यांचीही अशाच प्रकारे फसवणूक झाली असून त्यांनी या प्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट एककडे तक्रार दिली होती. त्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने सोमवारी कंपनीच्या कार्यालयावर धाड टाकून मनी ट्रेड कॉइन या आभासी चलनाचा खुलासा केल्याची माहिती आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली. त्याच्याकडे एचएसबीसी बँकेचे २५० कोटी रुपयांच्या ठेवीचे प्रमाणपत्र सापडले असून ते बनावट असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढण्यासाठी तो हे प्रमाणपत्रही दाखवत होता, असेही त्यांनी सांगितले. अमित लखनपाल याच्या विविध मासिकांमध्ये मुलाखती प्रसिद्ध झाल्या असून त्यामध्ये त्याचे सिने अभिनेते, राजकीय पुढारी आणि उद्योजकांसोबत छायाचित्रे आहेत. त्यांचीही अशा प्रकारे फसवणूक झाली आहे का, या दिशेनेही चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाचे अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासविण्यासाठी या कंपनीचा मालक आणि त्याच्या साथीदारांनी बनावट भेटकार्ड तयार केले होते आणि त्याद्वारे ते गुंतवणूकदारांना आपल्या जाळात ओढत होते. तसेच या चलनाद्वारे ऑनलाइन खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येणार असल्याचे दावे त्याने  केल्याचेही सिंग यांनी सांगितले.

सूत्रधार अटक..

मुंब्य्रातील तहा हाफीज काझी (२६) याने मनी ट्रेड कॉइन या आभासी चलनाच्या व्यवहारासाठी सॉफ्टवेअर तयार केले होते. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना चलनाचे दर पाहता येत होते. मात्र, त्या चलनाद्वारे खरेदी-विक्री करण्याचे अधिकार दिलेले नव्हते. हे सर्व अधिकार अमितने स्वत:कडे ठेवल्यामुळे तोच चलनाचे दर मनाला येईल त्याप्रमाणे वाढत होता. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना गंडा घालण्याचे काम सुरू होते. त्यामुळे या गुन्ह्य़ात तहा याला अटक केली आहे. तर अमित हा दुबईत असून त्यालाही भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही सिंग यांनी सांगितले.

पोलीस अधिकारी रडारवर..

मनी ट्रेड कॉइन या आभासी चलनप्रकरणात एका सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. त्यासंबंधीचाही तपास सुरू असून त्यात त्या अधिकाऱ्याचा सहभाग आढळून आला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्त सिंग यांनी सांगितले.

मनी ट्रेड कॉइनचे दर

गुंतवणूकदारांनी १५ ते २७ जुलै २०१७ या कालावधीत विकत घेतल्यास त्याची किंमत प्रति कॉइन एक डॉलर इतकी असेल. ३० जुलै ते १२ ऑगस्ट २०१७ या कालावधी विकत घेतल्यास दीड डॉलर, १५ ते२७ ऑगस्ट २०१७ या कालावधीत विकत घेतल्यास प्रति क्वॉईन दोन डॉलर , अशी बतावणी त्याने गुंतवणूकदारांना केली होती.भविष्यात त्याचा दर सहा हजार डॉलपर्यंत जाऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे स्वत: या कॉइनचे दर सहा हजार डॉलर इतके केले होते.