विश्व हिंदू परिषदेने अयोध्येत राममंदिर उभारण्याचा निर्धार केला आहे. सोमनाथ मंदिरासाठी ज्याप्रकारे संयुक्त अधिवेशन घेवून प्रस्ताव पारित केला त्याच धर्तीवर रामजन्मभूमीबाबत सरकारने तोडगा काढावा. अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र व गोवा प्रांताचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी केली. तसेच, राम मंदिराच्या निर्माणासाठी विहिंप देशभरात पाच हजार संकल्प सभा घेणार असून ८ एप्रिल रोजी ठाण्यात पहिली सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राम मंदिर निर्माण संकल्प सभेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत गायकर यांनी ही माहिती दिली. यावेळी विभागमंत्री विक्रम भोईर, ठाणे जिल्हा मंत्री दिपक मेढेकर आदी उपस्थित होते. काही तथाकथित बुद्धिवादी मंडळी रामजन्मभूमीवर मंदिर होऊ नये यासाठी योजनापूर्वक अडथळे निर्माण करत आहेत. याबाबत हिंदू-मुस्लीम समाजाने एकत्र येऊन दोन्ही बाजूंनी संयुक्तपणे याबाबतीत निर्णय करावा. असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. विश्व हिंदू परिषद त्या मताशी सहमत आहे. मात्र,आतापर्यंत एकाही मुस्लिम संस्थेने याला प्रतिसाद दिला नाही. आता केंद्र सरकारने याबाबत ठोस भूमिका घ्यावी. सोमनाथ मंदिरासाठी जसे सरदार वल्लभभाई पटेल यांनी, संयुक्त अधिवेशन बोलावले त्याच धर्तीवर संयुक्त अधिवेशन बोलावून राममंदिराचा प्रस्ताव पारित करावा. यासाठी देशभर ५ हजार तर महाराष्ट्रात २५० संकल्प सभा घेतल्या जाणार आहेत. राममंदिर निर्माणासाठीची महाराष्ट्रातील पहिली संकल्प सभा ठाण्यात शनिवार, ८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा. भगवती शाळेचे मैदान, विष्णूनगर, नौपाडा, ठाणे येथे होणार आहे. विहिंपचे अखिल भारतीय महामंत्री चंपतराय या सभेला संबोधित करणार असून महंत महावीर दास यांची प्रमुख उपस्थिती असेल. अशी माहिती यावेळी देण्यात आली.