आधारवाडी पासून ते खडकपाडा, बारावे, गंधारे पट्टय़ात कल्याण शहराच्या वेशीवर नवीन कल्याण वसले आहे. कल्याणमधील गजबज या नवीन वस्तीमुळे कमी होईल, असे वाटले होते. मात्र तिथेच सुविधांची बोंब आहे. या विस्तारित भागांचा विचार करणारा नगरसेवक पालिकेत निवडून देण्याची वेळ आली आहे. – हंसराज साबळे

नवीन कल्याण शहरातील रहिवाशांना कल्याण रेल्वे स्थानकातून संध्याकाळी घरी जायचे म्हणजे चंद्रावर जाययचे आहे की काय याचा अनुभव मिळतो. रात्री आठनंतर खडकपाडा, आधारवाडी, गंधारे, बारावे भागात रिक्षाचालक येण्यास तयार होत नाहीत. स्वतंत्र रिक्षा केली तर प्रवाशांचीच लूटच केली जाते. प्रवाशांचे दु:ख ओळखणारा नगरसेवक लोकांनी आता निवडून द्यावा. – रमेश ससाणे

वाढते नागरीकरण हे शहराला नवीन आकार देत असते. कल्याणमध्ये तर उलट परिस्थिती आहे. नागरीकरण वाढत आहे, तसे कल्याणअंतर्गत वाहने, प्रवासी, नागरिकांचा भार वाढत चालला आहे. नवीन विस्तारित भागात पालिकेने नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या, तर शहरावर त्याचा ताण येणार नाही. त्यामुळे दूरदृष्टीचा नगरसेवक निवडून दिला पाहिजे. – रणधीर शिंदे